“युजीसीची वास्तवतेचे असणारी नाळ तुटली राज्यस्तरीय चर्चासत्रात शिक्षणाचा नवा प्रारुप मांडला.”

0








 जत,प्रतिनिधी : येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या वतीने झालेल्या चर्चासत्रात बोलताना यूजीसीचे माजी चेअरमन डॉ. सुखदेव थोरात म्हणाले की, “हल्ली युजीसीची वास्तवतेशी असणारी नाळ तुटली आहे. वास्तवतेचा अभ्यास न करता केवळ फतवे काढणे हेच एकमेव काम यूजीसीचे नाही. परीक्षा घ्यायला हव्यात हे सांगताना त्या कशा घेता येतील याच्या शक्यतेचा अभ्यास केला गेला नाही. कोरोनाच्या महामारी संकट अधिकच गडद होत असताना, नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीसाठी दोन महिने उलटून गेले असताना गतवर्षातील परीक्षा घ्या असा दुराग्रह करून तरुणांना वेठीस धरणे योग्य नाही.”















कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण कसे, कधी आणि कोण देणार? या राज्यस्तरीय खुल्या चर्चासत्रात बोलताना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर म्हणाले की ,आपत्कालीन उच्च शिक्षणाचा वेगळा कृती आराखडा तयार करून तात्पुरत्या काळासाठी उच्च शिक्षणाचे स्वरूप बदलून तरुणाच्या बुद्धीला काम दिले पाहिजे. MKCL चे मुख्य सल्लागार विवेक सावंत यांनी ग्रामीण भागातील तरुणांना जागतिक प्रवाहात आणणारे शिक्षण देण्यासाठी तंत्रज्ञानाने आणि शिक्षकांनी तयार व्हायला पाहिजे असे मत मांडले. पारंपरिक शिक्षणातून बेरोजगारी वाढत असेल तर त्या शिक्षणातील उणिवा दूर झाल्या पाहिजेत असेही विचार त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र टाइम्सचे संपादक डॉ विजय चोरमारे यांनी महाराष्ट्रातल्या शिक्षण क्षेत्रात होणारा राजकीय हस्तक्षेप टोकाला गेला असल्याचे नमूद करून विद्यापीठ, कुलपती, युजीसी यांच्या अधिकारांना छेद देण्याचे काम राज्य सरकारे करीत असल्याचे सांगितले. मुंबई विद्यापीठ प्राध्यापक संघटनेच्या सरचिटणीस डॉ मधू परांजपे यांनी सर्वेक्षणाच्या आधारे सांगितले की उच्च शिक्षणातील ऑनलाइन पद्धत योग्य ठरणार नाही. शिक्षणाच्या मूळ तत्त्वाला छेद देऊन गरिबी आणि श्रीमंत यांच्यात पुन्हा वाढती दरी निर्माण होण्याची भीती व्यक्त केली. 






बीएमसीसी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर प्रशांत साठे यांनी परिस्थिती भयावह आहे मात्र या परिस्थितीची कुणी ढाल करू नये. नव्या आव्हानांना आणि प्राप्त परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शक्य असेल तिथे ऑनलाईन शक्य असेल तिथे ऑफलाईन या पद्धतीचा वापर करून शिक्षण चालू झाले पाहिजे असा आग्रह धरला. ग्राहक पंचायतीच्या राज्य सहसंघटक मेधा कुलकर्णी म्हणाल्या की ऑनलाइन शिक्षण चालू झाले पाहिजे पण त्यासाठी पालकांना वेठीस धरून त्यांची लूटही होता कामा नये. ऑनलाइनच्या नावावर अनेकजण विद्यार्थी व पालक यांना मोहात टाकून भरमसाठ पैसे उकळतात. बाजारात पुस्तकांचाही काळाबाजार चालू असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. पाथरगोटा तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली येथील विद्यार्थी संदीप आटोळे यांनी आदिवासी ग्रामीण भागात सोयी सुविधांची स्थिती काय आहे याचा पाढा वाचला पण या सुविधा पुरवायला शासनाने मदत करायला हवी असेही त्यांनी मत व्यक्त केले.

















      या चर्चासत्रातील मान्यवरांच्या विचार मंथनातून काहीएक निष्कर्ष काढण्यात आले आहेत. येत्या काळातही शिक्षण पद्धती कशी असावी यावर सर्वांगाने चर्चा झाली. यासाठीचा एक कृती आराखडा या चर्चासत्रात मांडला गेला असून त्याची योग्य ती दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी अशी अपेक्षा सर्वच मान्यवरांनी व्यक्त केली. चर्चासत्राच्या सूरवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विठ्ठलराव ढेकळे यांनी सर्वांचे स्वागत केले तर उद्घाटनपर मनोगतात बोलताना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी विवेकानंद शिक्षण संस्था सर्व प्रकारची नवी आव्हाने समर्थपणे पेलण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले. डॉ श्रीकांत कोकरे या सत्राचे सूत्रसंचालन केले तर डॉ संजय लट्टे, राजू सुतार, शिवाजी कुलाळ यांनी तंत्रसहाय्य केले. या चसर्चसत्राला देश-विदेशातून साडेचारशेहून अधिक लोकांची हजेरी लागली. तर डॉ संजय सुपणेकर, डॉ संतोष काकवीकर, डॉ राजेंद्र सूर्यवंशी, डॉ नितीन सोनजे आदी मान्यवरांनी सहभाग नोंदवला. 





“परीक्षेचा निर्णय तातडीने घ्या. डॉ थोरात”





परीक्षेचा निर्णय अत्यंत तातडीने घेणे गरजेचे आहे त्यावर राज्य शासन आणि युजीसी यांनी तातडीने निर्णय घेऊन शिक्षणाची पुढची दिशा तात्काळ ठरवून कार्यवाई केली पाहिजे असे परखड मत यूजीसीचे माजी चेअरमन डॉ. सुखदेव थोरात यांनी या चर्चासत्रात बोलताना मांडले.

Rate Card







“पुन्हा एकदा माझी माय उपाशी झोपणार काय?”



या सत्रात सहभागी वक्त्यांनी प्रसंगी पोटाला चिमटा काढून आपल्या पाल्याला ऑनलाइन शिक्षणासाठी नवा मोबाईल घेऊन द्यावा असे मत मांडल्यानंतर सहभागी विद्यार्थी संदीप आटोळे म्हणाला की,”माझी माय माझ्या आजवरच्या शिक्षणासाठी अनेकदा उपाशी झोपलीय आणि आता मोबाईल, लाईट, इंटरनेट यासाठी तिला पुन्हा एकदा उपाशी झोपावे लागणार काय?” या प्रश्नाचे उत्तर कोणाकडे न्हवते. मात्र या प्रश्नाने अनेकांच्या पापण्या ओल्या झाल्या हे मात्र खरे.





क्षणचित्रे:



तब्बल चार तास सलग चालली चर्चा.

विदेशातून साडेचारशे हून अधिक यांचा सहभाग.

ग्रामीण भागातल्या महाविद्यालयाचे सुरेख आयोजन

डॉ सुखदेव थोरात यांचा चार तास सलग सहभाग.

चर्चा डॉ श्रीकांत कोकरे यांच्या युट्युब चॅनेलवर उपलब्ध.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.