जतमधील दडपलेल्या पाच मृत्यूप्रकरणांची सीआयडीमार्फत चौकशी करा ; विक्रम ढोणे

0



पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांच्या कार्यकाळातील प्रकरणे; ढोणेंचे 17 जुलैपासून आमरण उपोषण 




जत,प्रतिनिधी : लॉकडाऊनच्या काळात जत तालुक्यातील राहूल दत्तात्रय काळे, कस्तुरी लक्ष्मण शिवणकर, म्हाळाप्पा शिवाजी मासाळ, महांतेश रामगोंडा पाटील, तुषार संभाजी शिंदे या पाचजणांच्या संशयित मृत्यूची प्रकरणे पोलिसांनी दडपलेली आहेत. हे सर्व लोक आर्थिक आणि सामाजिकदृष्या दुर्बल असल्याने पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांच्या कार्यकाळात आरोपींना वाचवण्यासाठी तपास केला गेला आहे. त्यामुळे यातील सत्य बाहेर यावे म्हणून याप्रकरणांचा तपास राज्य गुन्हे अन्वेषन विभाग (सीआयडी) मार्फत करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी केली आहे.

या मागणीसंदर्भात ढोणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र पोलिस दलाने अभिमानास्पद कामगिरी केली आहे, मात्र जत तालुक्यात लॉकडाऊनच्या परिस्थितीचा गैरफायदा घेवून संशयास्पद मृत्यू दडपण्याचे गुन्हेगारी कारस्थान केले गेले आहे. जत तालुका मागास असल्याचा फायदा घेवून संबंधितांनी स्वत:च्या तुंबड्या भरल्या आहेत. पैसे असतील तर केलेले खून पचवता येतात, हा संदेश या प्रकरणांतून समाजात गेला आहे. पीडित पाचही कुटुंबे गरीब आहेत, ते पोलिस प्रशासन आणि त्यांच्या दलालांच्या दबावाखाली आहेत. संबंधित सर्वजण प्रकरणे रफादफा केल्याच्या आनंदात आहेत. यापरिस्थितीत पाडित कुटुंबांना आताच न्याय मिळाला नाहीतर कधीच मिळणार नाही. म्हणून पोलिस दलालील वाईट प्रवृत्तींचा बिमोड होणे आवश्यक आहे. त्यामुळे या पाचही मृत्यूंची सीआयडीमार्फत चौकशी करण्याच्या मागणीसाठी 17 जुलैपासून जत प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषणास बसणार आहे, असे विक्रम ढोणे यांनी म्हटले आहे.

विक्रम ढोणे निवेदनात म्हटले आहे कि,

Rate Card

दि.17 जून 2020 रोजी रात्री राहुल दत्तात्रय काळे,(वय-30,रा.मेंढपाळनगर जत) यांचा जत पोलिस स्टेशनच्या पाठीमागे संशयित मृत्यू झाला. या घटनेसंबंधाने राहुल काळे यांच्या पत्नी, आई फिर्याद देत होते, मात्र ती घेतली गेली नाही. राहूल यांचा मृत्यू मारहाणीत झाला असे त्यांचे सांगणे होते, तसेच त्यांचा काही लोकांवर संशय होता, मात्र पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली. उलट नातेवाईकांना दमबाजी केली. तपासापुर्वीच राहूल यांचा मृत्यू झाडावरून पडून झाल्याचे रामदास शेळके सांगत होते. मृत्यू झाडावरून पडून झाल्याची माहिती त्यांनीच प्रसिद्धी माध्यमांना दिली.वैद्यकिय अधिकाऱ्यांचा अहवाल येण्यापुर्वीच पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांनी प्रकरणातील गांभिर्य संपवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मृत राहूल काळे यांच्यासोबत असलेल्या दोन मित्रांचे ऑडिओ आणि व्हिडीओ व्हायरल झाले. राहूल यांच्या मृत्यूवेळी या तिघांनाही मारहाण झाली, असे ते सांगतात.तरीही हे प्रकरण दड़पून टाकण्यात आले. प्रत्यक्षदर्शींनाही पोलिसांनी दमबाजी केली आहे.जत शहरात मारहाणीतून मृत्यू झाल्याची चर्चा असताना, कुटुंबिय फिर्याद देत असताना गुन्हा नोंदवला गेलेला नाही. प्रकरण दडपण्याचा प्रयत्न यात झाला आहे.  

कस्तुरी लक्ष्मण शिवणकर (वय 45, रा. खोजनवाडी, ता. जत) यांच्या संशयास्पद मृत्यूसंदर्भात वृत्तपत्रांत 20 मे रोजी बातम्या आलेल्या आहेत. कस्तुरी लक्ष्मण शिवणकर ज्या समाजातून येतात त्या समाजात मृत्तदेह जमिनीत पुरतात. मात्र त्यांचा मृत्तदेह जाळण्यात आला आहे. मात्र या प्रकरणातही काहीही कारवाई झालेली नाही.हा मृतदेह ज्या पद्धतीने जाळण्यात आला तो प्रकारच संशयाला पुष्टी देणारा आहे, मात्र प्रकरण मिटवण्यासाठी तपास रंगवण्यात आला आहे.

म्हाळाप्पा शिवाजी मासाळ (वय 27, रा. साळमगेवाडी, ता.जत) यांच्या आत्महत्येची बातमी 14 जून रोजीच्या वृत्तपत्रांत आलेली आहे. परंतु ही आत्महत्या नसून हत्याच आहे,अशी गावामध्ये चर्चा आहे.या कुटुंबाच्या भोळ्या स्वभावाचा गैरफायदा घेवून प्रकरण मिटवले गेले आहे.विशेष म्हणजे या प्रकरणाबाबत जिल्हापोलिस प्रमुख यांनाही निनावी पत्रव्यवहार झाला असल्याचे समजते.मात्र पुढे तपास झालेला नाही. महांतेश रामगोंडा पाटील (वय 27, रा.बिळूर ता. जत) यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची बातमी 26 जून रोजी आलेली आहे. मात्र हे प्रकरण पोलिसांनी दडपून टाकले आहे.ज्यांच्या मारहाणीत मृत्यू झाला, त्यांच्याकडून याचा खरा तपास होणे शक्य नाही. विविध मार्गाचा अवलंब करून हे प्रकरण दडपून टाकण्यात आले आहे.तुषार संभाजी शिंदे (वय 16, रा. हिवरे ता. जत) यांचा जिलेटीनमध्ये स्फोट होऊन मृत्यू झाला आहे. 21 मार्च 2020 रोजी घडलेले हे प्रकरण तडजोड करून मिटवण्यात आलेले आहे. याची पोलिस स्टेशनला नोंदही घेण्यात आलेली नाही.

या पाचही प्रकरणांत निष्पक्षपातीपणे तपास होणे आवश्यक आहे. हा तपास सीआयडीमार्फत (राज्य गुन्हे अन्वेशन विभाग) व्हावा, ही आमची मागणी आहे. या मागणीसाठी 17 जुलै 2020 पासून ‘उपविभागीय अधिकारी जत’ यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसत आहे. तरी तातडीने निर्णय करावा, अशी मागणी ढोणे यांनी निवेदनात म्हटले आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.