जतबंदला उत्फुर्त प्रतिसाद | रामदास शेळकेची बदली रद्द करण्याची मागणी : आज उपोषण

0

Rate Card

जत,प्रतिनिधी : पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांची आमदार विक्रमसिंह सावंत व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दबावामुळे बदली झाली आहे,ही बदली रद्द करावी,या मागणीसाठी भाजप,आरपीआय,रासप,वंचित बहुजन विकास आघाडी व विविध संघटनेने पुकारलेल्या जत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

सकाळपासून दुपारी 1 पर्यत  अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती.दरम्यान बंदमध्येच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दुकान उघडण्याचे आव्हान केले.यावेळी दोन्ही गट आमने-सामने आल्यामुळे काही काळ शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.मात्र नूतन प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे यांनी चोख पोलीस बंदोबस्त लावल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार  घडला नाही.

भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील पवार म्हणाले की, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी रामदास शेळके यांची बदली काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या उचापती मुळे झालेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रामदास शेळके यांनी चांगले काम केले होते.अशा कडक शिस्तीच्या अधिकाऱ्यांची जत गरज होती.आम्ही पुकारलेल्या जत बंदला व्यापारी वर्गाने चांगला प्रतिसाद दिला.कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जत बंद मोडीत काढण्याचे षडयंत्र रचलेल होते मात्र त्यांना व्यापारी वर्गाने दाद दिलेली नाही. उद्या सकाळी उपविभागीय कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सोशियल डिस्टनसचे पालन करून उपोषण करणार आहोत.या उपोषणात भाजपचे पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित राहणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे,अँड.प्रभाकर जाधव, रासपचे माजी जिल्हाध्यक्ष अजित पाटील,नगरसेवक उमेश सावंत,अमोल साबळे,गौतम ऐवळे,नगरसेवक प्रकाश माने,सलीम गवंडी,सुहास चव्हाण ,बाळ सावंत,आण्णा भिसे,अवधूत वास्टर आदीजण उपस्थित होते.

भाजपसह सर्व पक्षाने पुकारलेला जत कडकडीत पाळण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.