पो.नि.रामदास शेळके यांची बदली रद्द करा | आज सर्वपक्षिय उपोषण ; चार दिवस होणार आंदोलन

0

जत,प्रतिनिधी : जतचे सिघम पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांची बदली रद्दसाठी आज जत बंदची हाक देण्यात आली.काँग्रेस वगळता सर्वपक्षीय बंदमध्ये सहभागी होणार आहेत,हे आंदोलन वेगवेगळ्या अशा स्वरूपाचे असून बदली रद्द न झाल्यास ते चार दिवस चालणार आहे.दिनांक 1 जुलै रोजी जत शहर बंद, दिनांक 2 रोजी पोलीस उपअधिक्षक कार्यालयासमोर लाक्षणीक उपोषण,दिनांक 3 रोजी महाराणा प्रताप चौक येथे रास्ता रोको,तर 

दिनांक 4 रोजी पोलीस अधीक्षक, कार्यालय सांगली,लाक्षणीक उपोषण अशा प्रकारचे आंदोलन करणार असल्याचे लेखी निवेदन सर्वपक्षीय नेत्यांनी निवेदनाद्वारे दिले आहे.हे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे,प्रांताधिकारी प्रशांत आवटे,नायब तहसिलदार शेट्यापगोळ यांना देण्यात आले.

निवेदनावर जत तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील पवार,माजी सभापती तम्मनगौडा रवी पाटील,सरदार पाटील,नगरसेवक उमेश सावंत,आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे,अँड.प्रभाकर जाधव, रासपचे माजी जिल्हाध्यक्ष अजित पाटील,भूषण काळगी,नगरसेवक प्रकाश माने,वंचीत बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल साबळे,सलीम गवंडी, संतोष मोटे,सरपंच बसवराज पाटील,गौतम ऐवळे,बाळ सावंत,सुहास चव्हाण,बसपाचे तालुकाध्यक्ष सुनील क्यातन, सद्दाम अत्तार, संजय उर्फ बंडू कांबळे आदींच्या सह्या आहेत.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, जत पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांनी पदभार स्वीकारल्यापासून शहराला व तालुक्यातील चांगली शिस्त लावली आहे.जत शहरात असणारी बेशिस्त वाहतूक व्यवस्था सुरळीत करणेविषयी त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. भुरट्या चोरांनी जत शहर व तालुक्यात धुमाकुळ घातला होता पण शेळके यांच्या  कार्यपध्दतीमुळे यास आळा बसला आहे.जत शहरातील व्यापारी

वर्गामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती.जत शहर व तालुक्यातील मटका, दारू, गांज्या, चंदन तस्करी या सर्व अवैध धंद्यांना चाप बसविला आहे.जत तालुक्यात अवैध व पठाणी सावकारीने त्रस्त झाला होता,अनेक सर्व सामान्य कुटुंबे या पठाणी व्याजाने, उध्वस्त झाली होती.सावकारी धंदा मोडीत काढला. कोविड-19 च्या संकटात स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून दिवसरात्र केलेले कार्य विसरता येणार नाही.शिस्त व योग्य नियोजन त्यामुळे जत शहरात व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत झालेली आहे.

हे सर्व करताना शेळके यांना काही समाजकंटकांनी सतत मानहानी करण्याचे उदयोग केल्याने यास वैतागुन विनंती शेळके यांनी  बदलीचा अर्ज मा.पोलीस अधिक्षक यांना केला होता.त्यानुसार त्यांची बदली झाली. पण

वास्तविक पाहता शासन निर्णय  वित्त विभाग क्रं. अर्थसं-2020/प्र.क्रं 65/अर्थ-3, दि.04/05/2020 अन्वये पोलीस महासंचालक यांचेकडील पत्र क्रं. पोमसं/वउपस (आस्था-1) बदली/100/2020 दि.02/06/2020

Rate Card

अन्वये कोरोना महामारीच्या अनुषंगाने चालु वित्तीय वर्षात कोणत्याही संवर्गातील अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्या करू नये असा शासन निर्णय निर्गमीत केला आहे. त्यास अनुसरुन बदलीच्या विनंती अर्जाचाही विचार करता येत नाही. तरीही  शेळके यांची तडकाफडकी रातोरात बदली झाली.हे गैर असून परिणामी शेळके सारख्या प्रमाणिक व कर्तव्यनिष्ठ अधिका-याची रातोरात उचलबांगडी केल्यामुळे तालुक्यामधील सर्व प्रशासकीय अधिका-याचे मनोबल खच्चीकरण होईल व जत तालुक्याचे नुकसान होईल.शेळके यांच्या बदलीच्या निषेधार्थ व पुन्हा जत येथेच रुजु होणेच्या समर्थनार्थ आम्ही भाजपा, रिपब्लीक पार्टी ऑफ इंडीया, राष्ट्रीय समाजपक्ष, वंचीत बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष, टॅक्सी चालक संघटना, खोकी धारक संघटना,मानवाधिकार संघटना, जत शहर रिक्षा संघटना,चर्मकार संघटना, जत तालुका बांधकाम कामगार संघटना

इत्यादी पक्षाचे व संघटनाच्या पदाधिकारी यांचे वतीने  निषेध आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी भाजपचे तालुकाअध्यक्ष सुनील पवार म्हणाले की,आमदार सावंत यांनी नऊ महिन्यात एक रुपयांचा तरी निधी आणलेला दाखवावा,माझ्या पत्नीच्या सभापतीपदाचा राजीनामा देतो.काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरले नाही. पोलिस निरीक्षक शेळके यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केला असता आमदार व त्यांच्या समर्थकानी दबाव टाकून गुन्हा दाखल करू दिला नाही.या उलट कर्तव्यदक्ष अधिकारी शेळके यांची बदली केली आहे.त्यांची बदली रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.जतचे पो.नि.रामदास शेळके यांची बदली रद्द करावी या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांना देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.