कर्ज न देणाऱ्या बँकांवर गुन्हा दाखल होणार- गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ सुरु झाला आहे. त्यामुळे बळीराजाला पीक कर्जाची आवश्यकता आहे. पण अनेक राष्ट्रीय बँका या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याची बाब समोर आली आहे. ही अतिशय गंभीर बाब असून ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देणार नाही, अशा बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा गंभीर इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांना कर्ज मिळावे यासाठी राज्य शासन आग्रही आहे. यासाठी राज्य शासनाच्यावतीने देखील विशेष आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. असे असतानाही अनेक नॅशनलाईज बँका या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. ही अतिशय गंभीर बाब असल्याचं देशमुख यांनी म्हटलं आहे.
ज्या बँका पीक कर्ज देत नाही त्यांना वारंवार सूचना सुद्धा करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या बँकांची तक्रार जिल्हाधिकारी यांनी दिली तर अडचणीच्या काळात शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
