जत नगरपरिषदेची अष्टपूर्ती | कारभार दिशाहीन चर्चा फक्त घोटाळ्यांची: विक्रम ढोणे

0

Rate Card

नगरपरिषदेपेक्षा ग्रामपंचायत बरी म्हणण्याची वेळ जतकरांवर 

जत प्रतिनिधी: जत नगरपरिषद होऊन आठ वर्षे पूर्ण होत आली पण शहरात दूरदृष्टीने उठावदार नागरिकांच्या सोयीची आठ सुद्धा कामे झाली नाहीत,हे जतकरांसाठी दुर्दैव आहे,असा आरोप युवा नेते विक्रम ढोणे यांनी केला.

ढोणे पुढे म्हणाले की आठ वर्षापुर्वी ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर झाल्याने साहजिकच राज्य शासनाचा निधी मोठ्या प्रमाणात येणार आणि शहर स्वच्छ सुंदर होणार म्हणून नागरिकांमध्ये आनंदी वातावरण होते.पण नगरपरिषद स्थापन होऊन आठ वर्षानंतर नागरिकांना ग्रामपंचायत बरी होती म्हणण्याची वेळ आली आहे. नगरपरिषद होऊन राज्य शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत.पण ना शहर स्वच्छ झाले ना पाणी वेळेवर व मुबलक मिळाले ना रस्ते व गटारी व्यवस्थित झाले ना लहान मुलांना खेळण्यासाठी बगीचा ना ज्येष्ठ नागरिकांसाठी करमणूक केंद्र झाले.

 त्यामुळे नागरिकांमध्ये नगरपरिषदेच्या उदासीन कारभारामुळे नाराजी असून नगरपरिषदेतील तरुण लोकप्रतनिधींनी व प्रशासनाने सुसंवाद साधून शहरासाठी दिशादर्शक काम करावे हि रास्त भावना जतकरांची आहे.नगरपरिषदेत विशेष म्हणजे जास्तीत जास्त नगरसेवक हे तरुण असून त्यांनी विरोधाला विरोध न करता शहराच्या दृष्टीने चांगल्या कामासाठी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे.

 

विक्रम ढोणे म्हणाले,जत शहरामध्ये ग्रामपंचायत असताना विद्यानगर येथे बालोद्यान होते तिथे आता जनावरांचा मुक्कामाचे ठिकाण झाले आहे.दुसरे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान हे नगरपरिषदेच्या घोषणेनंतर अस्तित्वात आले पण दुर्लक्षामुळे तेही बोडके झाले आहे.नवीन तीन उद्यानांची निविदा प्रक्रिया पार पडून सहा महिने झाले,पण अजुन काम सुरू होण्याचा मुहूर्त सापडलेला नाही.

जत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बिरानाळ तलावामध्ये मुबलक पाणी असताना सुद्धा जत शहरामध्ये चार दिवसातून एकदा तेही अवेळी पाणी येते. हे फक्त नियोजनाअभावी घडते आहे. याकडे सुद्धा नगरपालिका प्रशासनाने आणि पदाधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

जत शहरात दूरदृष्टीने विचार करून रस्ते करण्यापूर्वी पाणी पुरवठा करणारी जुनी पाईप लाईन बदलणे आवश्यक होते. तसेच अनेक रस्ते व गटारी अर्धवट स्थितीत आहेत उदा. गुलाब गिरणी ते नागू दुकान,डॉ.पाटील ते साळे घर , रोहिदास नगर ते मायक्का मंदिर रोड , हराले समाज येथील विठ्ठल मंदिर शेजारील रोड येथील रस्ते अर्धवट स्थितीत आहेत.नेमके हे रस्ते का अर्धवट राहिले,यावर संशोधन करण्याची गरज आहे.

शौचालयावरती लाखो रुपये खर्च करून सुद्धा सार्वजनिक शौचालयामध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.सार्वजनिक शौचालयमध्ये पाणी व्यवस्था नाही,आणि ते वापरण्यास अयोग्य आहेत.

जत ग्रामपंचायत असताना शहरामध्ये आठ पुरुष मुताऱ्या होत्या ,आता फक्त दोन पुरुष मूताऱ्या अस्तिवात असून जत शहर हे तालुक्याचे ठिकाण असून जत शहरामध्ये पुरुष व महिला मुतारी असणे गरजेचे आहे.विशेष म्हणजे नगराध्यक्ष व 50 टक्के नगरसेविका महिला प्रतिनिधी असताना शहरामध्ये एकही महिलासाठी स्वच्छता गृह नाही ही लांच्छनास्पद आहे.

नगरपरिषदेकडे कचरा गोळा करण्यासाठी नऊ घंटा गाड्या असताना सुद्धा शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.अनेक गटारी तुडुंब भरून रस्त्यावरून वाहत आहेत याला फक्त पालिका प्रशासन व नगरपरिषदेतील सत्ताधारी व विरोधी पदाधिकारी यांच्या सुसंवाद अभावी घडत आहे.

नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरातील महिला बचत गटांना मिळणारा फिरता निधी असो किंवा शहरातील दिव्यांग बांधवांच्या त्यांच्या हक्काच्या दिव्यांग कल्याण निधीचे वाटप सुद्धा व्यवस्थित केले जात नाही.

नगरपरिषदेची प्रत्येक सर्वसाधारण सभा कोणत्या ना कोणत्या कारणाने वादग्रस्त ठरलेली आहे.प्रत्येक बैठकीत वाद ठरलेला असतो.  

नगरपरिषदेची जिल्हामध्ये  घोटाळ्याची नगरपरिषद अशी ओळख झाली आहे,ही ओळख पारदर्शक कारभार करून पुसणे गरजेचे आहे.नगरपरिषद प्रशासन शासकीय धोरणानुसार कामकाज करत नसल्याने शौचालय घोटाळा, निविदा घोटाळा, स्वच्छता टेंडर घोटाळा, संगणक, झेरॉक्स व प्रिंटर खरेदी घोटाळा,दलित वस्ती निधी घोटाळा अशा विविध घोटाळ्यानी बरबटलेली आहे,पुढेही अशीच  घोटाळ्यांची मालिका सुरूच आहे.

जत नगरपरिषदतील सर्व नगरसेवक तरुण आहेत.त्यांनी आपल्या शहराच्या भौतिक सुविधा व शहराचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी रचनात्मक व धोरणात्मक कामासाठी सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी हातात हात घालून प्रशासनाला सोबत घेऊन शहरात कामकाज करण्याची गरज आहे.जत शहरातील नागरिकांच्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करून नगरपरिषद स्थापन करण्याचा राज्य सरकारचा उद्देश सुद्धा सफल होईल,असे विक्रम ढोणे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.