मानवी क्रुरता,अतिरेक पर्यावरण,जैवविविधतेस घातक: प्राचार्य डाॅ. शेजवळ

0

जत,प्रतिनिधी : पृथ्वीतलावर सर्वात हुशार व संवेदनशील असणारा माणूस आत्मकेंद्री होऊन भौतिक सुखाच्या मागे लागला आहे. मानवी लोकसंख्या वाढीमुळे त्याच्या अंगी वाढत चाललेली क्रुरता, अतिरेकीपणा नैसर्गिक स्त्रोतांचा वाढत चाललेला वारेमाप वापर यामुळे पर्यावरण व जैवविविधतेचे अस्तित्व धोक्यात आले आहे,असे प्रतिपादन श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरचे अर्थ सहसचिव प्राचार्य डाॅ. राजेंद्र शेजवळ यांनी केले.

 ते राजे रामराव महाविद्यालय,जत मधील रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन-2020 निमित्त आयोजीत “शाश्वत विकासासाठी पर्यावरण व जैवविविधता” या दि. 4 व 5 जून या दोन दिवसीय पहिल्या ऑनलाईन परिषदेच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डाॅ.विठ्ठल ढेकळे होते.

डाॅ.शेजवळ पुढे म्हणाले, समृध्द पर्यावरण व जैवविविधता हि प्रत्येकाची नैसर्गिक संपत्ती आहे व तीचे जतन करणे हि सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. पर्यावरण संरक्षण चळवळ हि जगाचा केंद्रबिंदू झाली आहे. विकसित देशांनी नैसर्गिक स्त्रोतांचा वारेमाप वापर करून आता शाश्वत विकासाच्या दिशेने पाऊले टाकत आहेत. भारतासारख्या विकसनशील देशाने प्रगत देशांचे अंधानुकरण न करता शाश्वत विकासातून पर्यावरण संरक्षण केले पाहिजे व त्यासाठी सगळ्यात महत्वाचे आहे ते भारताच्या वाढत चाललेल्या  लोकसंख्येला आळा घालणे. कारण लोकसंख्यावाढीमुळे पर्यावरण हानीचे प्रमाण वाढत चालले असून पाणी, जमीन, समुद्र व हवा हे सर्व घटक प्रदुषीत झाले आहेत. त्यामुळे पर्यावरण जागृती हा शैक्षणिक अभ्यासाचा महत्वाचा विषय मानून युवा पिढीने संवेदनशील व कृतीशील बनून सामाजिक, आर्थिक व शाश्वत विकासासाठी पर्यावरण संरक्षण करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. 

तसेच चीनसारखे जंगली प्राण्यांची मांसाहारासाठी कत्तल केल्यास कोरोना व्हायरसारखे अनेक रोगकारक प्राणीजन्य विषाणू मानवी आरोग्यास बाधक ठरतील. कोरोनाच्या टाळेबंदीमुळे  मानवी हस्तक्षेप कमी झाल्यामुळे प्रदुषण पातळी खूप घटली असल्याने जंगलातले पशू-पक्षी मुक्त विहार करत आहेत, त्यांचे प्रजनन वाढत आहे, मानवी आरोग्य सुधारत आहे त्यामुळे भविष्यात सक्तीने वर्षातून तीन वेळा आठवडाभर टाळेबंदी केल्यास पर्यावरण व जैवविविधता समृध्द होण्यास हातभार लागेल. त्यामळे भविष्यात समृध्द जंगलात मानवी हस्तक्षेप कमी झाला तर जागतिक पर्यावरण दिन-2020 चे उद्दिष्ठ ‘पर्यावरणासाठी वेळ’ याचे सार्थक होईल. तरी आपण भावी पिढीसाठी पर्यावरण संरक्षणासाठी आपला बहुमोल वेळ देऊन जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी, शेवटी त्यांनी आवाहन केले.

Rate Card

प्र. प्राचार्य डाॅ. विठ्ठल ढेकळे म्हणाले की, शाश्वत विकासासाठी पर्यावरण व जैवविधता यांचे संरक्षण करण्यासाठी एनएसएस, एनसीसी, तरूण मंडळे, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन यांसारखे पर्यावरणपुरक कृतीशील कार्यक्रम राबवावेत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संयोजक प्रा. डाॅ. राजेंद्र लवटे यांनी तर आभार प्रा. डाॅ. शिवाजी कुलाळ यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा.डाॅ. सचिन दांगट यांनी केले.

उद्घाटन समारंभानंतर स.11 वा. प्रा. डाॅ. ए. पालावासम यांचे”एन्वायर्नमेंटल स्टेटस अँण्ड इश्यूज वीथ रिस्पेक्ट टू एश्चूरीज इन साऊथ इस्ट कोस्ट ऑफ इंडिया” दु.12 वा. प्रा. डाॅ. डॅनिएल मीझ यांचे “टेक्नाॅलाॅजी टू स्टडी द बर्डस मुव्हमेंट” व दु. १ वा. प्रा. डाॅ. देवू भांगे यांचे “रोल ऑफ केमिस्ट्री फाॅर बल्क साॅलीड वेस्ट मॅनेजमेंट: प्रेझेंटेशन ऑफ फ्यू केसेस” अशी तीन बीजभाषणे पार पडली.सदर राष्ट्रीय परिषदेस देशातील विविध विद्यापीठे व महाविद्यालयातील 300 प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवून पर्यावरण, जैवविविधता, शाश्वत विकास या क्षेत्रातील ताज्या संशोधनावर चर्चा केली. कार्यक्रमाच्या सुरवातीला 55 संशोधकांच्या संशोधन पत्रिकांचा गोषवारा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशीत करण्यात आला.

उद्घाटनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. महादेव करेन्नावर, प्रा. कृष्णा रानगर, प्रा. दिपक कुंभार, डाॅ. शिवाजी कुलाळ, प्रा. मल्लाप्पा सज्जन, डाॅ. विजय जाधव, प्रा. अभय पाटील, प्रा. गोविंद साळुंखे, डाॅ. सचिन दांगट, प्रा. कु. विद्या माळी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

जत जागतिक पर्यावरण दिन-2020 निमित्त “शाश्वत विकासासाठी पर्यावरण व जैवविविधता” कार्यक्रम संपन्न झाला.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.