नागाव (कवठे) | तुटलेल्या विजेच्या तारेचा धक्का लागून महिला मजूर ठार

0

‘महावितरण’च्या निष्काळजीपणामुळे गेला जीव : नागरिकांमधून संताप

तासगाव : तालुक्यातील नागाव (कवठे) येथील माळी मळ्यात तुटलेल्या विजेच्या तारेचा धक्का लागल्याने रेखा माणिक मदने (रा. नागाव कवठे, वय 36) या महिला मजुराचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. घटना घडून 3 तास उलटले तरी अद्याप घटनास्थळी पोलीस आणि महावितरणचे लोक पोहोचले नाहीत. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे या मजुराचा जीव गेल्याच आरोप नागरिकांनी केला आहे.

याबाबत माहिती अशी, काल (सोमवारी) वादळी वाऱ्यामुळे नागाव (कवठे) येथील माळी मळ्यात उदय जयसिंग पाटील यांच्या द्राक्षबागेत विजेची तार तुटून पडली होती. याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कल्पना देऊनही कालपासून या तारेतील विद्युत प्रवाह बंद केला नव्हता.

Rate Card

आज (मंगळवार) सकाळी उदय पाटील यांच्या बागेत नागाव (कवठे) येथील रेखा मदने यांच्यासह अन्य कामगार मंजुरीसाठी आले होते. सकाळी 7 वाजता काम सुरू होताच रेखा यांना तुटलेल्या तारेतून विजेचा धक्का लागला. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत सकाळीच महावितरण आणि पोलिसांना कल्पना दिली आहे. मात्र घटना घडून तीन तास उलटत आले तरी अद्याप घटनास्थळी पोलीस अथवा महावितरणचे अधिकारी, कर्मचारी पोहीचले नाहीत. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यामुळे ही तार तुटली होती. त्यावेळीच या तारेतील विद्युत प्रवाह बंद केला असता तर या महिलेचा जीव गेला नसता. महावितरणच्या निष्काळजीपणामुळेच या महिला मजुराचा जीव गेल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य संतोष आठवले यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.