पोलीसावर हल्ला करणाऱ्या संशयिताला अटक

जत,प्रतिनिधी : अटक वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या पोलीसावर हल्ला करून आठ महिन्यापासून फरार असलेल्या रेकार्डवरील गुन्हेगाराला जत पोलीसांनी अटक केली.सुभाष दिलीप काळे,(वय 37,रा.सातारा रोड पारधी तांडा जत) असे संशयिताचे नाव आहे.पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,मे 2019 मध्ये सुभाष काळे याला वॉरंट बजावण्या करिता गेलेल्या पोलीस नाईक प्रविण पाटील यांना धक्काबुक्की,मारहाण करून काळे पळून गेला होता.त्याच्या दोघा साथीदारांना पोलीसांनी यापुर्वी अटक केली आहे.काळे गेल्या 8 महिन्यापासून फरार होता.त्या काळात त्यांने जत,मिरज,भुईज,सांगोला व कर्नाटकमध्येही घरफोडी,जबरी चोरी,पोलीसावर हल्ला असे 15 गुन्हे केले आहेत.वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.जत पोलीस निरिक्षिक राजाराम शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जत पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू असून अन्य काही गुन्हे उघडीस येण्याची शक्यता आहे.