थंडीचा जोर वाढू लागला | दिवसभर गारवा : शेकोट्या पेटू लागल्या

0

जत,प्रतिनिधी :जत तालुक्यात थंडीमध्ये चढउतार होताना दिसत आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून थंडीच्या कडाक्याने नागरिकांंना हुडहुडी भरली आहे. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी बाजारपेठेत उबदार कपडे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असून ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने थंडीची लपाछपी सुरु होती.  मात्र बुधवारपासून पुन्हा थंडीमध्ये वाढ झाली. गेल्या दोन दिवसात किमान तापमानाबरोबर कमाल तापमानातही घट होवू लागली आहे. त्यामुळे दिवसाही थंडी जाणवत आहे. या बोचर्‍या थंडीमुळे थंडी नको-नकोशी वाटू लागली आहे. रात्री उशीरापर्यंत गजबजणारे रस्ते आता लवकर निर्मनुष्य होताना दिसत आहेत. वाढत्या थंडीमुळे शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र दिसत असून सकाळी व रात्री उशिरापर्यंत शेकोट्याभोवती नागरिकांची गर्दी होत आहे. थंडीच्या कडाक्यामुळे सकाळच्यावेळी शाळा, महाविद्यालयात जाणार्‍या विद्यार्थी-विद्यार्थिनींची तारांबळ उडत आहे. एक दोन दिवस थंडी पडल्यानंतर पुन्हा आभाळ येत असल्यामुळे विचित्र हवामानाचा सामना नागरिकांना करावा लागत होता.  मात्र, गेल्या 2 दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे.स्वेटरसह उबदार कपडे घालूनच बाहेर वावरावे लागत आहे. सातारा शहरातील कपडे दुकानासह एस. टी. स्टँड, पंचायत समिती परिसरात कापड विक्रेत्याजवळही स्वेटर, मफलर, कान टोपी, कान पट्ट्या, जर्किंग, हातमोजे, या कपड्यांबरोबरच लहान मुलांच्या उबदार कपडे खरेदीसाठी गर्दी होत आहे. 

Rate Card

ग्रामीण भागामध्येही थंडीचा कडाका वाढला असून गावोगावी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत गावाच्या पारावर शेकोट्याभोवती  राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये ऊस तोडणी कामगारांच्या पालाभोवती थंडीमुळे पहाटे व रात्रीच्यावेळी शेकोट्या पेटलेल्या दिसून येत आहेत. या थंडीने सगळ्यांनाच हुडहुडी भरत असून भल्या सकाळी व पहाटे काम करणारे कष्टकरी थंडीचा सामना करण्यासाठी मिळेल त्या ठिकाणी आडोसा पाहून काट्याकुट्यांच्या सहाय्याने शेकोटी पेटवून बचाव करताना दिसत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.