कौस्तुभ लवटेची प्रजासत्ताक दिन संचलन शिबिरासाठी निवड

जत : न्यू काॅलेज, कोल्हापूर मधील राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक कौस्तुभ लवटे याची नवी दिल्ली येथे 1 ते 31 जानेवारी,2020 या कालावधीत होणा-या राष्ट्रीय सेवा योजना संचलन पथक निवड शिबिरासाठी निवड झाली आहे.
देशात 36 लाख स्वयंसेवक कार्यरत असतात. यामधून 144 निवडक स्वयंसेवकाची तुकडी राजपथ येथे होणा-या संचलनासाठी निवडली जाते. यापैकी महाराष्ट्रातून 14 स्वयंसेवक (प्रत्येकी 7 मुले-मुली) निवडले जातात. अंतीम निवड चाचणी शिबीर नवी दिल्ली येथे 1 जानेवारी पासून महिनाभर आयोजीत केले जाते.14 स्वयंसेवकापैकी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मधून एकमेव कौस्तुभ ची निवड झाली असून तो महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठ निवड चाचणी, औरंगाबाद येथील तीन दिवसीय चाचणी शिबीर तसेच गुजरात येथील दहा दिवसीय चाचणीतून संचलन व सांस्कृतिक मधील गुणांच्या आधारे त्याची निवड करण्यात आली आहे.
कौस्तुभ हा न्यू काॅलेज, कोल्हापूर मधील बी.एस्सी. (बाॅटनी) तृतीय वर्गाचा विद्यार्थी आहे. तो राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कृष्ठ स्वयंसेवक आहे. “स्वतःसाठी नाही तर दुस-यासाठी जगण्याची एनएसएस ची शिकवण मला भावली म्हणून मी एनएसएस चा स्वयंसेवक बनलो व विविध शिबिरात व उपक्रमात सक्रिय सहभागी झालो. प्रजासत्ताक दिन पथसंचलन शिबीरासाठी निवड झाली हा माझ्या जीवनातील अत्यानंदाचा क्षण आहे ” असे तो म्हणाला.
या निवडीसाठी त्याला महाराष्ट्र राज्य एनएसएस चे विभागीय संचालक अजय शिंदे, राज्य संपर्क अधिकारी अतुल साळुंखे, कुलगुरू डाॅ. देवानंद शिंदे, विद्यापीठ समन्वयक डाॅ. डी. के. गायकवाड, प्राचार्य डॉ. व्ही.एम. पाटील, महाविद्यालय कार्यक्रम अधिकारी डाॅ. एम.बी. वाघमारे, प्रा. सौ. सी. व्ही. राजाज्ञा व इतरांचे मार्गदर्शन लाभले.