डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील लोकशाही गरजेचे : संजय कांबळे

जत,प्रतिनिधी : अनेक कारणांनी भारतीय लोकशाही व्यवस्थेसमोर सध्या अनेक प्रश्नचिन्हे उभी आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील लोकशाही विषयीचे चिंतन महापरिनिर्वाण दिनी प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी केल.जत येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्य अभिवादन करण्यात आले.यावेळी आंबेडकर चळवळीतील अनेक नेते उपस्थित होते. कांबळे पुढे म्हणाले
आज आपण ज्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थितीतून पुढे जात आहोत, त्या स्थितीचा विचार करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘लोकशाही’ या संकल्पनेतील आशय आपण कसा गमावत आहोत, याचाच प्रत्यय येतो. डॉ. आंबेडकरांना या देशात राजकीय लोकशाहीतून सामाजिक व आर्थिक लोकशाहीची प्रस्थापना करावयाची होती. म्हणूनच ते राजकीय लोकशाहीचे सामाजिक लोकशाहीत परिवर्तन व्हावे, यासाठी आग्रही होते. म्हणजेच लोकशाही प्रणालीतून त्यांना या देशातील लोकांच्या जीवनात सामाजिक व आर्थिक स्तरावर आमूलाग्र परिवर्तन घडवून आणायचे होते. केवळ निवडणुकीत लोकांना मताधिकार मिळाला म्हणून तेवढ्याने यशस्वी लोकशाही साकार होईल, असा भाबडा आशावाद त्यांच्या मनात नव्हता. कारण या देशात अगदी प्राचीन काळापासून जे एक सामाजिक वास्तव अस्तित्वात आहे, ते लोकशाही तत्त्वांना मारक आहे याची त्यांना जाणीव होती. याच पार्श्वभूमीवर लोकशाहीचा विचार करताना त्यांनी लोकशाहीचे अत्यंत मूलभूत स्वरूपाचे चिंतन वेळोवेळी प्रकट केले.
जत येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.