देवनाळमध्ये पानी फाउंडेशनच्या कामामुळे जलक्रांती

0
Rate Card

शेगांव,वार्ताहर : जत तालुक्यातील देवनाळ या गावामध्ये 2018-19 या वर्षात पानी फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाच्या व पानलोटाच्या कामामुळे गावातील पाझर तलाव, बंधारे व ओढ्यातुन पाणी दुधडी भरुन वाहत आहेत.जत हा राज्यात दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून दोन वर्षांत बरचं काम इथे झाले आहे. प्रथम म्हणजे गावाचा एकोपा असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही हे देवनाळ गावांनी सिद्ध करून दाखवलं आहे. गावाच्या बाजूला असलेल क्षेत्र त्यावरील केलेले पाणी फाऊंडेशनचे उत्कृष्ठ उपचार गावच्या एकीमुळेच पुर्ण करता आल्याचा आनंद इथल्या ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. 

देवनाळ हे अवघ्या 1166 लोकसंख्येचे गाव, दुष्काळग्रस्त भाग असल्याने गावाने अनेक नैसर्गिक संकटांचा सामना केला आहे. गावकऱ्यांनी गावाला, समाजाला आपले काही देणे लागते या उदात्त हेतूने दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी श्रमदान करणे गरजेचेच आहे,अशी प्रतिज्ञाच केली. माता,भगिनी,तरुण युवा पिढी, लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी श्रमदान करून गाव पाणीदार करण्यास प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला आहे. सर्व गावकऱ्यांनी मिळून श्रमदानातुन 7790 तर मशीनच्या साहाय्याने 1,56,362 असे एकूण 1,64,152 घनमीटर इतके काम करण्यात आले आहे. याचे सरकारी बजेट हे काही कोटी रुपयात आहे. हे सर्व काम ग्रामस्थांनी श्रमदानातून व यांत्रिकी पद्धतीने केले आहे. या कामासाठी भारतीय जैन संघटना, टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट मुंबई, अनुलोम संस्था, अभिजीतदादा कदम नागरी सहकारी पतसंस्था मर्या पुणे, तिप्पेहळ्ळी व देवनाळच्या ग्रामस्थांनी आर्थिक मदत केली. त्याचबरोबर जिल्हा परिषद सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, मिरज पंचायत समितीचे कक्ष अधिकारी संजय शिंदे, जतचे तत्कालीन प्रांताधिकारी तुषार ठोंबरे व तहसिलदार अभिजित पाटील व पानी फाउंडेशनचे सर्व समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांनी जलसंधारणच उत्तम काम उभे केले असे प्रतिपादन या कामात गावाचे नेतृत्व करणारे प्रा तुकाराम सन्नके यांनी व्यक्त केले.देवनाळमध्ये स्पर्धेच्या काळात संपुर्ण 45 दिवस गावकर्‍यांनी अहोरात्र काम केले असून आज या कामांचे फलित  गावांमध्ये दिसून येत आहे. खळखळ वाहून जाणारे लाखो/ करोडो लिटर पाणी जमिनीत मुरत आहे. त्याचा परिणाम म्हणून अत्यंत खोल कोरड्याखाक विहीरींची व बोअरवेलची पाणीपातळी झपाट्याने वाढली. पाणीपातळी वाढून जरी आर्थिक सुबत्ता येणार असली तरी या स्पर्धेने गावांमध्ये एक प्रकारे जलक्रांती केली आहे. ही जलक्रांती कशी झाली याबद्दल आम्ही घेतलेला हा आढावा खालीलप्रमाणे 

1. गावातील लोकांना पाण्याची साठवण करून भूजल पातळी वाढवता येते याची जाणीव झाली. 

2. प्रत्येक जातीधर्मांचा गावकरी जात पात विसरून या कामात सहभागी झाला. 

3. 95 वर्षे वयाची लोकं या कामात उतरल्याने तरुणांना आपण काहीतरी करू शकतो हा विश्वास निर्माण झाला. 

4.आपली सर्व ताकद राजकारणी लोकांच्या मागे फिरून, त्यांनी प्रत्येक वेळी चालढकल केल्यामुळे आपण अंधारात आहोत याची भावना तरुणांना झाली. चार शिकलेली लोकं एकत्र आली आहेत. आपणही त्यांच्यासोबत काम करू आणि आपला आत्मविश्वास वाढवू ही भावना तरुणांमध्ये निर्माण झाली.

5. प्रत्येक व्यक्तीमधील कौशल्य समजण्यास मदत झाली.

6. राव अर्थात राजकीय पुढारी जे आतापर्यंत करू शकला नाही ते आपण करू शकतो या विचारांची बिजे गावकर्यांमध्ये रोवली गेली. 

7. पाणी बचतीची संकल्पना वाढीस लागली.

8. जनता आणि अधिकारी यांच्यातील जवळीक वाढली. 

9. अनेक सरकारी योजनांचा फायदा घेऊन विविध उपक्रम राबविण्यात येऊ शकतात हे समजू लागले. 

यासह अनेक बदल गावात आता होत आहेत. शिकलेल्या लोकांची मानसिकता बदलत आहे. आता ग्रीन देवनाळ नावाची संकल्पना पुढे आली आहे. त्यामुळे येत्या काळात देवनाळचे महाबळेश्वर झाल्याशिवाय राहणार नाही. आता यापुढे सोशीक, सहनशील देवनाळ मोठ्या हिमतीने, दिमाखात आपले नेतृत्व गाजवत राहील यात शंका नाही. असा निर्धार येथील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

देवनाळ येथे पावसामुळे साठपा झालेले प्रचंड पाणी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.