आघाडी सरकारने 48 गावाचा समावेश टाळला विलासराव जगताप : म्हैसाळ योजनेसाठी 40 वर्षापासून माझा संघर्ष

जत : जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी 1988 पासून मी संघर्ष करतोय.त्यावेळी जतमध्ये मोर्चा काढल्याने 1000 लोकांना अटक झाली होती.तेव्हापासून गेली 40 वर्षे जत तालुक्याच्या विकासासाठी झटत आहे.म्हैसाळ योजना 35 वर्षांची आहे.यातील 30 वर्षाच्या कालावधीत 350 कोटी रुपये खर्च झाले आणि माझ्या पाच वर्षांच्या काळात 400 कोटी रुपये निधी खेचून आणला.पंधरा वर्षांपूर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या शासनाच्या काळात 48 गावांचा योजनेत समावेश झाला नाही.शिवाय या योजनेला 100 ते 150 कोटी रुपये त्यावेळी दिले असते, तर ही योजना त्याचवेळी पूर्ण झाली असती.आज निवडणुकीसाठी जे उमेदवार उभे आहेत,त्यांचे सामाजिक कार्य काय आहे हे तपासावे.अनेक पदे मिळूनही विक्रम सावंत हे जनतेसाठी काहीही करू शकले नाहीत.डॉ.आरळी हे कधीच कोणाच्या कामासाठी बाहेर पडले नाहीत.जे दोन उमेदवार उभे आहेत त्यांना केवळ सत्ता भोगून संपत्ती कमवायची आहे.मलीदा घेऊन कोण कोणाकडे जातोय याच्याकडे लक्ष देऊ नका.कारण माझा निकाल जनतेने दिला असून जनतेच्या बळावर माझा विजय निश्चित असून या पुढच्या काळात जिल्ह्यात जत तालुका विकासाचा केंद्रबिंदू होण्यासाठी मी माझी आमदारकी पणाला लावणार असल्याचे महायुतीचे उमेदवार विलासराव जगताप यांनी केले.
जत तालुक्यातील उंटवाडी, रावळगुंडवाडी,पाच्छापूर,शेडयाळ, दरीकोनूर,तिल्याळ, पांडोझरी,करेवाडी,जालिहाळ बु.,मोरबगी,भिवर्गी, दरीबडची येथील जाहीर सभेत बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, बीळ्यानसिदध बिराजदार,आप्पू गडीकर,आर.के.पाटील,प्रभू मोकाशी,बापू पाटील,प्रकाश मोरे,मोहन गडदे,सिद्धण्णा राजगोंड,सुनील जाधव,अशोक जाधव,विश्वास भोसले,विठ्ठल सर्जे,नामदेव पुजारी,कपिलदेव पारसे,आप्पासाहेब पाटील,आनंदराव पाटील,बाबू खरात,आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार जगताप म्हणाले की,जत तालुक्यात प्रत्येक विधानसभा निवडणुकीत पैसेवाला उमेदवार पाहून त्याला हवा भरण्याचे काम काही टोळ्याकडून होत आहे.त्या टोळ्यांना जतच्या विकासाचे काहीही देणेघेणे नसून पैसे निघेपर्यंत उमेदवारांना हवा भरली जाते.अशा लोकांना मतदारांनी वेळीच ओळखले पाहिजे. कर्नाटक राज्यातून पाणी पाहिजे असेल तर आंतरराज्य करार व्हावा लागतो. त्याशिवाय पाणी मिळत नाही, तरीसुद्धा काँग्रेसची मंडळी तिकोंडी, मोटेवाडी तलावात पावसाचे आलेलं पाणी पूजत लोकांची दिशाभूल करत आहेत.मी माझ्या राजकीय जीवनात कधीही जात-पात मानली नाही.कर्तृत्व सिद्ध न करता जातीचे लेबल लावून निवडणूक जिंकता येत नसून मला सर्वाचे पाठबळ मिळाल्याने मी राजकिय जीवनात यशस्वी झालो असून येणाऱ्या निवडणुकीत मला मोठं पाठबळ देऊन विधानसभेत पाठवा असे आवाहन शेवटी आमदार जगताप यांनी केले.
जत तालुक्यातील उंटवाडी येथील सभेत बोलताना आ.विलासराव जगताप