पावसाच्या पाण्याचे विक्रम सांवतांकडून पुजन | आ.विलासराव जगताप | विरोधकांकाडून जनतेची फसवणूक

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील रस्ते, वीज,जलसंधारणाची कोट्यवधी रुपयांची कामे गेल्या 35 वर्षात जेवढी झाली नाहीत,तेवढी कामे या पाच वर्षात झाली आहेत.या भागातील म्हैसाळ योजनेच्या कामाला गती आली आहे.मी माझ्या राजकीय जीवनात कधीही खोटे बोललो नाही.काँग्रेसचे विक्रम सावंत यांनी जत पूर्व भागात तिकोंडी तलावात तुबची-बबलेश्वरचे पाणी आले म्हणून पाणीपूजन केले.पाऊस झाल्याने हे पावसाचे पाणी आले होते.हेच पाणी भीषण दुष्काळात का नाही मिळाले?हा साधा प्रश्न कोणालाही समजतो.पण या पाण्याचे पूजन करून खोटे बोलून,लोकांची दिशाभूल करण्याचा उद्योग सुरू आहे अशाकडून जनतेने काय अपेक्षा ठेवायची?असा सवाल आमदार विलासराव जगताप यांनी करत ज्यांनी भारतीय जनता पक्षात 28 वर्षे घालवली,तिकीट मिळण्याअगोदर पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचे डिजीटल लावून प्रचार केला ते आता बंडखोरी करत निवडणुकीला उभे आहेत अशा व्यक्तींची पक्षनिष्ठा लोकांनी तपासावी असे आवाहन आमदार जगताप यांनी केले.
आमदार जगताप विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने शेगाव, लोहगाव,आवंढी ,मोकाशेवाडी, बागलवाडी या गावात आयोजित केलेल्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी रासपचे अजितकुमार पाटील,जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील,कार्याध्यक्ष सुनिल पवार,प्रमोद सावंत,शिवसेनेचे अमित दुधाळ,पप्पू कारंडे,माजी सभापती संजय सावंत,रफिक शेख,सचिन मदने आदी उपस्थित होते.
भाजपचे कार्याध्यक्ष सुनील पवार म्हणाले की, विक्रम सावंत यांना दोन पदे मिळूनही त्यांनी काहीही केले नाही.एक विकासाचा दृष्टिकोन असावा लागतो ,तो त्यांच्याकडे नाही.केवळ गोड बोलणे एवढेच त्यांना जमते.त्यामुळे पूर्ण तालुक्याच्या विकासाचे व्हिजन असणारे एकमेव नेतृत्व म्हणून आमदार जगताप यांना पुन्हा विधानसभेत पाठवू या.यावेळी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील म्हणाले की,जत तालुक्याचा खऱ्या अर्थाने विकास करावयाचा असेल तर आमदार विलासराव जगताप यांच्याशिवाय पर्याय नाही. तिसऱ्या आघाडीचे उमेदवार डॉ. आरळी यांनी आजपर्यंत जत तालुक्याची किती आणि कशा पद्धतीने समाजसेवा केली हे पूर्ण तालुक्याला माहीत आहे.गेल्या चाळीस वर्षांपासून राजकारण व समाजकारण करत असलेल्या आ. जगताप यांनी जत तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने संघर्ष केला.गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर तालुक्यात विकास कामे झालेली आहेत.त्यामुळे भविष्यात जत तालुका पाणीदार करण्यासाठी आमदार जगताप यांच्याशिवाय पर्याय नसून जातीयवादी प्रचाराला बळी न पडता,त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करू या असे आवाहन शेवटी पाटील यांनी केले.
रासपचे अजितकुमार पाटील म्हणाले की, काँग्रेसच्या राज्यपातळीवर काम करणाऱ्या नेत्यांनी अभ्यास न करता बेछूट आरोप करू नयेत.आमदार जगताप हे विधिमंडळात मला दिसलेच नाहीत असा आरोप करणाऱ्या बाळासाहेब थोरातांनी जत तालुक्यासाठी 1200 कोटी रुपयांचा निधी आमदार जगताप यांनी कसा खेचून आणला याचा अभ्यास करावा मगच आरोप करावेत.जत तालुक्याच्या विकासासाठी कोणताही राजकीय वारसा नसताना,संघर्ष करणारे नेतृत्व म्हणून आमदारांची ओळख असून तालुक्याच्या विकासासाठी मतदारांनी आमदारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे.
यावेळी शेगावचे माजी सरपंच लक्ष्मण बोराडे,माजी चेअरमन सचिन बोराडे,आर.टी. शिंदे,हरिश्चंद्र शिंदे,किशोर बुरुटे,शहाजी गायकवाड,लोहगावचे अच्युतराव काशीद,सुभाष पाटील,आवंढी येथील माणिकराव पाटील,राजू कोडग, मोकाशेवाडीचे शहाजी गायकवाड,बागलवाडीचे माजी सरपंच अरुण खांडेकर आदी उपस्थित होते.
शेगाव ता.जत येथील सभेत बोलताना आ.विलासराव जगताप,शिवसेनेचे संजीवकुमार सांवत,प्रमोद सांवत आदी
