जत | माजी सैनिकाच्या बंदुक चोरी प्रकरणी चौघे अटकेत |

जत, प्रतिनिधी : जत तालुक्यातील राजोबाचीवाडी येथील माजी सैनिक काकासो पांढरे यांची डबल बार बंदुक चोरीप्रकरणी पांढरे यांचे नातेवाईक केराप्पा जयवंत ढेंबरे,व जत येथील विष्णू रामा वाघमोडे,अण्णाप्पा लक्ष्मण कोरे,अनिल आनंदा पवार या चौघांना जत पोलिसांनी अटक केली. चोरीला गेलेली बंदुक जत येथील वाघमोडे यांच्या शेतात मिळून आली.
पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,राजोबाचीवाडी येथील माजी सैनिक काकासो पांढरे हे सध्या मुंबई येथे खाजगी कंपनीत कामाला आहेत.ता.28 ऑगस्ट रोजी राजोबाचीवाडी येथील
घरातून परवाना असलेली डबल बार बंदुक व चार काडतुसे चोरीला गेल्याचे पत्नीने सांगितल्यावरून काकासो पांढरे यांनी पोलीसात तक्रार दिली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. माजी सैनिक पांढरे यांनी राजोबावाडी येथीलच नातेवाईक केराप्पा जयवंत ढेंबरे याच्यावर संशय व्यक्त केला होता.त्याला ताब्यात घेत पोलिसांनी खाक्या दाखवताच ढेंबरे याने आपण जत येथील विष्णू वाघमोडे,अण्णाप्पा कोरे व अनिल पवार यांच्या ताब्यात बंदुक व काडतुसे दिल्याचे सांगितले.वाघमोडे यांच्या शेतात लपवून ठेवलेली बंदुक व काडतुसे पोलिसांना मिळून आली.
