जतेत लवकरचं दुष्काळी फोरमची स्थापना | मन्सूरभाई खतीब यांची माहिती

जत : जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच दुष्काळग्रस्तांच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरच दुष्काळी फोरमची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मन्सूरभाई खतीब यांनी दिली. ते म्हणाले,जत तालुका हा वर्षान् वर्षे दुष्काळी परिस्थितीशी सामना करीत आहे.तालुक्यातील रोजगाराचे साधन असलेला जत साखर कारखाना तालुक्यातील राजकारणामुळे बंद पडला आहे.तसेच तालुक्यात रोजगाराचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने हजारो लोक आपल्या व कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी ऊसतोड करण्यासाठी अन्य राज्यात जात आहेत. तालुक्यातील लाखो तरून उच्च शिक्षण व पदव्या घेऊन ही बेरोजगार म्हणून भटकत आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे या तालुक्यातील विवाह योग्य मुलांना बाहेरील लोक आपल्या मुली देणे नाकारत आहेत. तालुक्यातील सर्वच साठवण तलाव तसेच पाझर तलाव पाण्याअभावी कोरडे पडल्याने तालुक्यात हजारो फुट विंधन विहिरी घेऊनही विंधन विहीरींना पाणी लागत नसल्याने तालुक्यात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तालुक्यातील शेतकरी ट्रँकरचे विकतचे पाणी घेऊन आपल्या फळबागा जगविताना दिसत आहेत. तालुक्यातील जनावरे चारा व पिण्यासाठी पाणी नसल्याने चारा छावण्याच्या आश्रयाला गेली आहेत. इतकी दुष्काळाची भयानकता तालुक्यात असताना राज्यातील सरकारचे व प्रशासनाचे या दुष्काळी तालुक्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.एकीकडे महापुराने हजारो गावे उध्वस्त होत आहेत. हजारो लोकांचे संसार उघड्यावर पडत आहेत. अशा पुरग्रस्तांना राज्यातील सरकार मदतीसाठी मोठ मोठी अश्वासन देत आहेत.महापुराने ज्यांचे नुकसान झाले आहे.ज्यांची घरे पडली आहेत अशा कुटुंबाना सरकार नविन घरे बांधून देणार आहे.बांधकामासाठी लागणारी वाळू व मुरूम शासन मोफत देणार आहे. तसेच जो पर्यंत त्यांचे घर बांधून पूर्ण होत नाही तो पर्यंत सरकार अशा कुटुंबाना ते ज्या घरात भाड्याने रहातात त्या घराचे भाडे सरकार स्व:ता भरणार असल्याची घोषणा केली आहे.पुरामुळे उध्वस्त झालेल्या पुरग्रस्तांना मदत देण्याबाबत आमचे दुमत नाही. उलट पुरग्रस्तांना पहिली मदत आमच्या दुष्काळ ग्रस्तानीच दिली आहे. आमचे म्हणणे हे आहे की, राज्य सरकार नदीकाठावरील सधन शेतकरी व दुष्काळग्रस्त शेतकरी यांच्या मध्ये भेदभाव करताना दिसत आहे.दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी तसेच उसतोड कामगार आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आपले रहाते घर सोडून इतर राज्यात निघून जातो,अशा वेळी राज्य सरकारने या दुष्काळ ग्रस्तांसाठी भरीव मदत करावी. तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीन वेळा पिक विम्याचे पैसे भरून ही त्यांना पिक विम्याचे पैसे मिळत नाहीत ही शोकांतिका आहे. त्यांना पिकविम्याचे पैसे मिळाले पाहिजेत ही आमची मागणी आहे. मागील पंधरवड्यात सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये नद्यांना महापुर येउन हे महापुराचे पाणी नागरी वसाहती व शेतामध्ये घुसून या महापुरामुळे अनेक लोकांना आपला जिव गमवावा लागला असून अनेक जनावरे ही मृत्युमुखी पडली आहेत. या महापुरामुळे अनेकांचे होत्याच नव्हते झाले आहे. हेच महापुराचे वाया जाणारे पाणी राज्य सरकारने योग्य नियोजन करून दुष्काळी तालुक्यातील सिंचन योजनेव्दारे सोडून दुष्काळी तालुक्यातील साठवण तलाव व पाझर तलाव तसेच बंधारे व ओढे नाले भरून घेतले असते,तर महापुराने जे नुकसान झाले आहे. ते कमी प्रमाणात झाले असते. तसेच या पाण्यामुळे दुष्काळी तालुक्याचा दुष्काळग्रस्त हा कलंक पुसला गेला असता.दुष्काळामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी शासनाचे जे कोट्यावधी रुपये खर्च केले जातात ते वाचले असते.त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात नद्यांना महापूर येऊन वाया जाणारे पाणी दुष्काळी तालुक्यातील जलस्त्रोत भरण्यासाठी करावा ही आमची मागणी आहे. यासाठीच आम्ही तालुक्यातील सर्वच पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक बोलावून या बैठकीत सर्वपक्षीय दुष्काळग्रस्त फोरमची स्थापना करून तालुक्यातील दुष्काळ ग्रस्तांना व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच दुष्काळग्रस्तांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे खतीब यांनी सांगितले.
