जत तालुक्यात रोहयोची कामे वाढवा : आयुक्त दीपक म्हैसेकर

0

दुष्काळ व टंचाई स्थितीची केली पाहणी

सांगली : दुष्काळ व टंचाईच्या स्थितीमध्ये लोकांच्या हाताला काम असावे यासाठी रोजगार हमी योजनेमधून वैयक्तिक कामांबरोबरच रस्ते, कृषि, सिंचन आदि स्वरूपातील कामे मागणीनुसार मोठ्या प्रमाणावर सुरू करावीत, असे सांगून विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विहिरींच्या कामांच्या बाबतीत भूजल सर्वेक्षण विभागाचे प्रमाणपत्र घेण्यात यावे, असे निर्देश दिले.

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी जत तालुका दुष्काळ व टंचाई स्थितीबाबत पाहणी दौरा केला. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) किरण कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, तहसिलदार जत सचिन पाटील, गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे  आदि उपस्थित होते.

या दौऱ्यामध्ये विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी माडग्याळ येथील नरेगा अंतर्गत करण्यात येणाऱ्या विहीर कामास भेट दिली. यावेळी त्यांनी माडग्याळ परिसरात सुरू असलेले टँकर, पाण्याचे स्त्रोत याबाबत माहिती घेवून ज्या ठिकाणी टँकरमध्ये पाणी भरले जाते त्या ठिकाणी ओटी टेस्ट चाचणी घ्यावी. ब्लीचिंग पावडरचा साठा करावा व लोकांना पिण्यायोग्य पाणी मिळेल याबाबत दक्षता घ्यावी असे सांगितले. व्हसपेठ येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात पाणी वितरण व्यवस्थेची पाहणी केली. सिध्दनाथ येथील गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. सिध्दनाथ तलावाची क्षमता 91.72 एमसीएफटी क्षमता आहे.  या तलावामध्ये सुमारे 24 लाख घनमीटर गाळ असून आत्तापर्यंत 806 घनमीटर गाळ काढला आहे. शेतकऱ्यांचे मागणी अर्ज घेवून त्याप्रमाणे त्यांना गाळ द्यावा व त्याचे रेकॉर्ड ठेवावे असे सांगून अधिकाधिक यंत्रणा याकामी लावून पावसाळ्यापूर्वी काम संपवावे. या दौऱ्यामध्ये त्यांनी टंचाईग्रस्त गावे, टँकरची संख्या, बाधित लोकसंख्या, पशुधन संख्या, मंजूर खेपा, सुरू असलेल्या चारा छावण्या आदिंबाबत माहिती घेवून दुष्काळ व टंचाई स्थितीमध्ये आवश्यक त्या सर्व उपाययोजना गतीमान करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

Rate Card

00000

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.