जत | दुष्काळाची दाहकता वाढली; तालुक्याचे अर्थकारण कोलमडले |

0

जत,प्रतिनिधी :पावसाने हुलकावणी दिल्याने जत तालुक्यात दुष्काळ पडला असून खरीप हंगामासह रब्बी हंगामदेखील वाया गेला आहे. पाणी व चारा याची टंचाई निर्माण झाली असून सर्वाधिक फटका ऊस पिकाला बसला आहे. जनावरे जगवायची असतील तर आता 25 भर चारा छावण्यांची गरज असून चारानिर्मितीसाठी शासनाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या दुष्काळामुळे तालुक्याचे अर्थकारण कोलमडून पडले अाहे. त्याचा सर्वाधिक फटका शेतकर्‍यांसह व्यापारीवर्गाला बसला आहे.जत हा रब्बी हंगामाचा तालुका आहे. परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे खरिपासह रब्बीचा हंगामदेखील वाया गेला आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी व चारा आदींचे प्रश्‍न गंभीर बनले आहेत. जानेवारीपासून चाराटंचाईची समस्या गंभीर होणार आहे. त्यामुळे चारा पीक निर्मितीसाठी जिल्हा प्रशासनाने आतापासून मोहीम हाती घेतली आहे. साधारणतः फेब्रुवारी ते जूनदरम्यान जिल्ह्यात चारा छावण्या उभाराव्या लागणार असून 25भर चारा छावण्यांची गरज भासेल, अशी माहिती प्रशासकीय सुत्राने दिली आहे.  राज्य सरकारने तालुक्यात दुष्काळ जाहीर केलेला आहे तसेच चाराटंचाईबाबत अहवालही मागविलेला आहे. या अहवालानुसार तालुक्यात लाखवर पशुधन आहे.

या पशुधनाला जगविण्यासाठी चारा व पाणी याचे नियोजन आतापासून करावे लागणार आहे. तूर्त तरी प्रशासनाने चारानिर्मितीवर भर दिलेला आहे. फेब्रुवारीअखेर चारा छावण्यांची गरज पडेल, असा प्रशासनाचा अंदाज आहे. चारानिर्मितीसाठी प्रशासनाने प्रकल्प निवडले जाणार आहेत. त्याद्वारे चारा उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. त्या धर्तीवर शेतकर्‍यांना चारा बियाण्यांचे वाटप केले जात आहे.

Rate Card

त्याद्वारे ओला चारा उपलब्ध होण्याची प्रशासनाला आशा आहे. तालुक्यात पाण्याअभावी अंदाजे 5 हजार हेक्टर क्षेत्रावर खोडवा उसाचे क्षेत्र कमी होणार असले तरी सध्या 10 हाजार हेक्टरवर ऊस उपलब्ध आहे. या उसाच्या वाड्यापासूनही चारानिर्मिती होणार आहे.

पाणीटंचाईचा प्रश्‍न मात्र गंभीर होणार असल्याचे संकेत मिळत आहे. अनेक लघु व मध्यम प्रकल्प कोरडे पडले असून बहुतांश गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य शासनाने भरघोस निधी देण्याची गरज आहे. अनेक गावांतून टँकरची मागणी सुरू झाली असून टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरु केलेली आहे.  या दुष्काळाचा सर्वाधिक फटका तालुक्याच्या अर्थकारणाला बसला आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून नोटाबंदी, मंदी व जीएसटीमुळे आधीच हवालदिल झालेला व्यापारीवर्गही व्यापारउदीम ठप्प झाल्याने अडचणीत आलेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.