बिंळूर | हल्ला प्रकरणातील अरोपीवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी मोर्चा |

0

जत,वार्ताहर:बिळूर(ता.जत)येथील नाभिक समाजातील सलून कारागिरावर हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीस कठोर शासन होण्याच्या व समाजाच्या इतर मागणीसाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळ,मुंबई शाखा सांगलीच्या वतीने जत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.हा मोर्चा संत सेनामहाराज मंदिर ते वाचनालय चौक,किस्मत चौक ,शिवाजी पेठमार्गे तहसील कार्यालयावर आला.मोर्चात जत तालुक्यातील सलीम दुकाने बंद ठेऊन नाभीक बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सांगली जिल्हा व जत तालुका नाभिक संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार शेट्यापगोळ यांना निवेदन देण्यात आले.मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष प्रा.सोमनाथ साळुंखे, उपाध्यक्ष गजानन सपकाळ, संपर्क प्रमुख राम बनकर, जत तालुकाध्यक्ष बसवेश्वर गंगाधरे ,राजेंद्र गायकवाड,मल्लिकार्जुन हडपद आदींनी केले.

Rate Card

       निवेदनात म्हटले आहे की,बिळूर येथे रविवारी दि.25 रोजी नाभिक समाजातील काही सलून कारागिरावर सलून काम करीत असताना दुकानात घुसून काही समाजकंटकांनी मारहाण केली.सलून दुकानातील साहित्याची मोडतोड करून जीवे मारण्याची धमकी दिली.लोकशाहीला काळिमा फासणारी ही घटना असून अल्पसंख्याक समाजावर हल्ला करून धमकावणे, जातीवाचक शिवीगाळ करण्याचा हा प्रकार धक्कादायक आहे.ग्रामीण भागात सलून सेवेचे काम करणाऱ्या कारागिरास त्रास देण्याच्या घटना वारंवार घडताना दिसतात.बिंळूर येथील कारागिरांना मारहाण करणाऱ्या,जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या समाजकंटकाना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करावी, सलून कारागिरांना संरक्षण मिळण्यासाठी कायदा करावा,जातीवाचक शिवीगाळ व मानसिक त्रासापासून अट्रोसिटी कायद्याअंतर्गत संरक्षण मिळणेसाठी शासनाने निर्णय घ्यावा.तसेच सलून सेवेचे दर ठरविण्याचा अधिकार नसतानाही ग्रामपंचायतीमध्ये,ग्रामसभेत या विषयी चर्चा होते.सलून सेवेचे दर कमी करण्यासंदर्भात दबाव टाकला जातो.शिवाय ग्रामपंचायत हद्दीतील सलून बंद करण्याची भीती घातली जाते. या संदर्भात योग्य निर्देश,पत्रक  ग्रामपंचायतीला द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.

जत: बिंळूर हल्ला प्रकरणातील अरोपीवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.