संख | दुष्काळाने मरण कवटाळण्याची वेळ,पाणी,चारा संपला ; प्रशासनाची अनास्था : लोकप्रतिनीधीचा निवडणूका दिसू लागल्या
संख,वार्ताहर: जत तालुक्यातील प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे तालुकावासीयांना दुष्काळाच्या तीव्र झळांचा सामना करावा लागत आहे. एकीकडे नियोजनाअभावी पाण्याची टंचाई, तर दुसरीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे यात भर पडताना दिसत आहे.जत तालुक्यात 70 वर गावांमध्ये भीषण पाणीटंचाईचा प्रश्न, जनावरांना चारा, तालुक्यातील खराब झालेले रस्ते, शेतकर्यांच्या मालाला हमीभाव, ऊस उत्पादक शेतकर्यांच्या बिलाचे प्रश्न, निराधार योजनेंतर्गत मिळणारे मानधन, ग्रामपंचायत कर्मचार्यांचे आंदोलन व खरीप व रब्बी हंगामाच्या दुहेरी संकटात अडकलेल्या शेतकर्यांचे आदी जिव्हाळ्याचे प्रश्न गंभीर असताना सध्या याकडे फारसे कुणी लक्ष देताना दिसत नाही. सध्या प्रशासनाकडून वेळकाढूपणा चालू आहे. जनतेला फक्त आश्वासन मिळताना दिसते. त्याची अंमलबजावणी होताना मात्र दिसून येत नाही. या सर्व परिस्थितीमुळे तालुक्यातील जनता त्रस्त झाली आहे. यंदा तालुक्यातील जनतेला दुष्काळात तेरावा महिना असल्याचा सध्या भास होत आहे.
हेही वाचा: जत | टंचाईचा मुकाबला करण्यास प्रशासन सज्ज : प्रांताधिकारी तुषार ठोंबरे |
तालुक्यात भीषण पाणीटंचाई
जत तालुक्यातील पुर्व भागातील जवळपास सर्व गावांत माणसांना व जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळेना. बहुसंख्य गावपातळीवरील लोक हे पाण्यासाठी वणवण भटकंती करताना दिसतात. यामुळे शाळकरी मुले, महिला व वयोवृद्धांचे हाल होत आहेत.पाण्याविना दिवाळीसारखा मोठा सण साजरा करताना गावकर्यांच्या नाकीनऊ येत आहे. पाणीटंचाई करीता गावपातळीवरील सरपंच, ग्रामसेवक व सदस्य हे प्रशासनाकडे चकरा मारुन वैतागून गेले आहेत. तरीही गावकर्यांना न्याय मिळताना दिसत नाही. तालुक्यात बहुसंख्य गावात नागरिकांचे अनेक ज्वलंत प्रश्न असताना याविषयी कोणीही आवाज उठवताना दिसत नाही.इकडे लोकप्रतिनिधी व प्रशासन मात्र आश्वासनावर आश्वासन देत वेळकाढूपणा करताना दिसतात.
तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था
तालुक्यात अशी अनेक गावे आहेत की, त्या गावांना जाण्या- येण्यासाठी रस्तेच नाहीत. गावकर्यांनी गावाला पक्क्या रस्त्यांची अनेक दिवसांपासून मागणी करुनही रस्त्यांची कामे होत नसल्याने गावकरी हतबल झाले आहेत. अनेक गावात ग्रामसभा घेऊन गाव ठराव घेऊन जोपर्यंत गावाला रस्ता होत नाही, तोपर्यंत गावातील नागरिकांनी तटस्थ राहून येणार्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयाला सध्या गावपातळीवरुन जोर धरू लागला आहे.नव्याने रस्ते झाले खरे पंरतू वर्षभरात पुन्हा खड्डे प्रशासनाचे पितळ उघडे करणारे ठरले आहे.
हेही वाचा:

निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष
सध्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी मतदारांचा अंदाज घेत मतदारसंघाची बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यात अनेक गावे सोयीसुविधांपासून वंचित आहेत.असे अनेक गावांचे प्रश्न अजेंड्यावर असताना याकडे फारसे कुणी लक्ष देताना दिसत नाही.सर्वांचे लक्ष मात्र येणार्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीकडे लागले आहे. यामुळेच यंदा मतदारच लोकप्रतिनिधी व प्रशासनासमोर हतबल झाला आहे.
तालुक्यातील निराधारांचे प्रश्न
तालुक्यात संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावण बाळ व परितक्त्या लाभार्थ्यांची संख्या इतर तालुक्याच्या मानाने अधिक आहे. या लाभार्थ्यांचे मानधन कधीच वेळेवर जमा होताना दिसत नाही.
ऊस उत्पादक शेतकरी संकटात
तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कारण गेले आठ महिने झाले तरी शेतकर्यांना एफआरपीप्रमाणे दर मिळाला नाही. नवीन गाळप हंगाम सुरू झाला तरी शेतकर्यांना उसाचे बिल मिळताना दिसत नाही.
संख काही तलावात असणारा पाणीसाठीही मोटारी लावून बेसुमारपणे उपसा केला जात आहे.तो थांबवणार कोन.?