लेखी तक्रार आल्यास स्टँप विक्रेत्यांचे परवाने रद्द करू,जिल्हाधिकारी : जतच्या महसूल प्रशासनाला कारभार सुधारण्याचे आदेश

0

जत,प्रतिनिधी : जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांच्यासमोर जत दुय्यम निबंधक कार्यालय व स्टँप विक्रेत्यांच्या अनागोंदी कारभाराचा पाढाच नागरिकांनी वाचला.जिल्हाधिकारी काळम-पाटील यांनी दुय्यम निबंधक  व स्टँप विक्रेत्यांची चांगलीच खरडपट्टी केली. कारभार सुधारा अन्यथा कारवाई करू, लेखी तक्रार आली तर स्टँप विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात येतील असा सज्जड ईशारा दिला.
सोमवारी मतदान याद्याच्या कामासाठी सांगलीचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील जत तहसील कार्यालयात आले.त्यांच्यासमोर नागरिकांनी कैफियत मांडली.यंत्रणेच्या छळवादाचा पाढाच वाचला. उपनिंबधक कार्यालयातील बेबंदशाही, स्टँप विक्रेत्यांना मनमानी कारभाराच्या थेट तक्रारी काळम-पाटील यांच्याकडे केल्या. कशी अडवणूक केली जाते यांची माहिती त्यांना नागरिंकानी दिली.
त्यावर संबधित विभागाचे अधिकारी व स्टँप विक्रेत्यांना जागेवर बोलवून घेत जिल्हाधिकारी काळम-पाटील यांनी त्यांची कानउघडणी केली.यापुढे एक जरी तक्रार आली तर कारवाई अटळ असल्याचे सांगत स्टँप विक्रेत्यांचे परवाने रद्द करू असा सज्जड दम त्यांनी दिला.सोमवारी जत तहसिल कार्यालयात नवीन मतदार नोंदणीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी आले होते. ते तहसिल कार्यालयातील दुय्यम निबंधक कार्यालयासमोर आले असता अनेक नागरीकांनी वेळेवर स्टॅम्प मिळत नाहीत. वेगवेगळी कारणे देऊन जाणून बुजून जादा दराने स्टँप विक्री करतात. खरेदी-विक्री विभागात सतत संगणकाचा एरर असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे दोन-दोन दिवस खरेदी होत नसल्याचे जिल्हाधिकारी काळम-पाटील यांना सांगितले. उपस्थित नागरिकांना दिलासा देत त्यांनी माझ्या कार्यालयाकडे लेखी तक्रार करा, अशा सुचना दिल्या.दुसरीकडे जिल्हाधिकारी यांच्या या कारवाईने नागरिंकांनी कृतज्ञता व्यक्त केली.तर अनेक विभागातील मुर्दाड यंत्रणेला धडकी भरल्याचे चित्र किमान सोमवारीतरी तहसील कार्यालयात होते.
जत तहसील कार्यालयातील सर्वच विभागात कामासाठी आलेल्या नागरिकांची लुटमार करत छळवणूक केली जात आहे.तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना लक्ष्मीदर्शन होत असल्याने नागरिकांनी तक्रारी करूनही सर्व अलबेल असल्याचे चित्र दाखविले जाते. निर्सगांची अवकृपा, पोटाला चिमटा देऊन साठवलेले पैसे कोणत्याही शासकीय कामासाठी या तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हातावर ठेवावे लागतात, तरचं कामे होतात. नाहीतर त्रुटीचा बडगा उगारून कामे रखडविली जातात. दररोज याचा नागरिकांना अनुभव येत आहे. आपलेच नशीब फुटके म्हणून येथील छळवाद निमुटपणे सहन करत कामे करून घेतली जातात. लोकप्रतिनिधीची चिडीचूप, अधिकाऱ्यांची मिलीभगत यामुळे तक्रार करायची कुठे अशा विवंचनेत नागरिक दररोजचा दिवस ढकलत असतात.सोमवारी त्याला जिल्हाधिकारी यांच्यासमोर वाचा फुटली.

Rate Card

जत तहसील कार्यालयातील मुजोर स्टँप विक्रेत्यांची खरडपट्टी करताना जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.