सोन्याळ साठवण तलावाचे काम अडकले लालफितीत,चार वर्षापुर्वी भूमिपूजन होऊनही काम शुन्य : प्रशासन कागदी घोडे नाचविण्यात व्यस्त

सोन्याळ,वार्ताहर:सोन्याळ ता.जत येथील साठवण तलावाचे काम जमिनी अधिग्रहणाची प्रक्रिया लालफितीत अडकल्याने रखडले आहे.परिणामी दुष्काळात पाणी साठवणासाठी तलाव महत्वपुर्ण असताना शासकीय यंत्रणा कागदी घोडे नाचवत आहे.शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या या तलावाचे काम तातडीने अडचणी दुर करून पुर्ण करावे अशी मागणी होत आहे.
तलाव कामाचे चार वर्षापुर्वी भूमिपूजन झाले आहे.मात्र अद्याप कामास सुरूवात झालेली नाही.संबधित विभागाच्या उदाशीन भुमिकेमुळे तलावाचे काम प्रत्यक्षात सुरू होत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने अधिग्रहन व विरोधी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवून तलावाचे काम पुर्ण करावे अन्यथा तीव्र अंदोलन करू असा इशारा सोन्याळच्या सरपंच सौ. संगीता निवर्गी,विजयकुमार बगली,संगप्पा पुजारी,काडसिद्द काराजनगी,सोमलिंग पुजारी,चिदानंद बिरादार,जक्कु निवर्गी,माजी उपसंरपच चिंदानंद तेली यांनी दिला आहे.
महाराष्ट्र शासन ग्रामीण भागात पाण्याची टंचाई भासू नये, सिंचना क्षेत्रात वाढ व्हावी या उद्देशाने कोट्यवधी रुपये खर्च करून ठिकठिकाणी नालाबांध बंधारे आणि साठवण तलावाची निर्मिती करीत अाहे. मात्र खालचे विभागाकडून या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यामुळे योजनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे वास्तव आहे. परिणामी अनेक दिवस रखडलेल्या कामामुळे खर्चाचे बजेट वाढणार असून शासनाचे अतिरिक्त निधी खर्च होणार आहेत.जतच्या लघू सिंचन जलसंधारण विभागामार्फत सोन्याळ तलावाला मंजूरी दिली आहे. प्रत्यक्षात तलावामुळे सोन्याळसह,माडग्याळ,लकडेवाडीतील सुमारे 500 हेक्टरहून जादा शेती सिंचनाखाली येणार आहे. त्याशिवाय नागरिकांना पिण्यासाठी हक्काचा पाणीसाठा उपलब्धं होणार आहे.त्यामुळे सोन्याळ,लकडेवाडी, माडग्याळ परिसराचा दुष्काळातून मुक्ती शक्य आहे.या कामासाठी शासनाने 5 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. काही शेतकऱ्यांनी विरोध केल्याने काम रखडले आहे. प्रत्यक्षात अपेक्षित नुकसान भरपाई,व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम करणे गरजेचे होते. मात्र शासन नियम, व कायद्याच्या कचाट्यात तलाव अडकाविला आहे.प्रशासनाने कागदी घोडे नाचविण्यात धन्यता मानली आहे.परिणामी गेल्या चार वर्षापासून पाण्याविना हा भाग होरफळत आहे.कोणत्याही सिंचन योजनेपासून वचिंत असलेल्या या भागातील तलावाचे काम पुर्ण करावे यासाठी तालुकास्तरीय लोकप्रतिनिधी व प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे.
सोन्याळ गावापासून साडेतीन किलोमीटरील डोंगरातील विठुरायाच्या मंदिराजवळ हा नियोजित तलाव होणार आहे.सोन्याळसह,माडग्याळ, लकडेवाडी या गावातील जमिनी तलावात जाणार आहेत.मात्र तलावाच्या पुर्ण होण्याने सुमारे 500 हेक्टरहून जादा क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्याशिवाय म्हैशाळ सिंचन योजनाचे काम लकडेवाडी येथपर्यत पुर्ण होत आले आहेत. तेथून म्हैशाळ योजनेचे पाणी सोडल्यास नैसर्गिक उताराने ते या तलावात येऊ शकते.त्यामुळे भविष्यात पावसाविना हा तलाव म्हैशाळ योजनेतून भरणे शक्य होणार आहे.तलावाच्या अधिग्रहनात अधिकाऱ्यांच्या हलगर्जी मुळे विरोध वाढला होता.विरोधातील शेतकऱ्यांच्या बैठक घेऊन अडचणीवर मार्ग काढावा.