जत,प्रतिनिधी:जत शहरासह तालुक्यातील अनेक गावात अनेक ठिकाणी वाळूचे मोठ-मोठे ढीग आहेत. महसूल प्रशासनाच्या कृपेने तालुक्यात चोरट्या मार्गाने येणाऱ्या वाळूचे ढीग वाढत आहेत. वाळू उपसा करण्याचे ठेके दिलेले नसताना शहरात वाळू कुठून येत आहे. असा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे. शहरासह तालुक्यातील अनेक गावात वाळूचे मोठमोठे ढीग साचले असून, ती वाळू कोठून आली, कुणाच्या कृपेने आली, याचे उत्तर महसूल प्रशासन, पोलीस देणार की नाही, असा प्रश्न आहे. सात महिन्यांपासून जिल्ह्यातील जवळपास सर्वच वाळूपट्टे तस्करांच्या विळख्यात आले आहेत. परिणामी गौण खनिजातून मिळणारा बहुतांश महसूल यावर्षी बुडाला आहे. सात महिन्यांत वाळू उपसा करण्यासाठी प्रशासनाने अधिकृतरीत्या ठेका दिलेला नसताना शहरात वाळू कोणत्या पट्ट्यातून येते, याचा शोध घेण्यासाठी प्रशासन धजावत नाही. प्रशासनाला कोट्यावधीच्या रुपयांचा महसूल अपेक्षित होता.सध्या एकही वाळूपट्टा ठेकेदाराच्या ताब्यात नाही. मग वाळू शहरात येते कोठून? याचा शोध प्रशासनाला का घेता आला नाही. वाळू चोरीमध्ये मोठ्या प्रमाणात संबंधितांना मदत करीत असल्याचे महसूल प्रशासनाने वारंवार बैठकीमध्ये सांगितले आहे; परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.