सोनलकर चौकातील बाबाजी सायकल दुकान पुन्हा फोडले अडीच लाखाचा मुद्देमाल लंपास ; एकाच दुकानात पाचवी चोरी: एकाचाही छडा नाही
जत,प्रतिनिधी; शहरातील सोलनकर चौकालगत असलेले बाबाजी सायकल दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे 2 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.ही घटना शुक्रवारी रात्री घडली,याप्रकरणी जत पोलिसात शनिवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. दुकान मालक सरफराज बाबाजी नदाफ हे इस्तेमासाठी औरंगाबाद येथे गेले आहेत.त्यामुळे दोन दिवस दुकान बंद होते.या संधीचा फायदा घेवून अज्ञात चोरट्यांनी बंद दुकानाचे शटर कटावणीने उचकटून दुकानातील बँटरी,एमआरएफ कंपनीचे टायर,सायकल रिम,व इतर स्पेअर पार्टस् असा मुद्देमाल चारचाकी वाहनात भरून लंपास केला आहे. सदरची घटना सामाजिक कार्यकर्ते गणेश गिड्डे व दुकानातील कामगार संतोष माळी यांच्या शनिवारी सकाळी लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती जत पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली आहे.दुकानात नेमका किती मुद्देमाल होता व किती मुद्देमाल चोरीला गेला आहे.यांची सविस्तर माहिती सरफराज बाबाजी नदाफ यांच्याकडे असल्याने ते आल्यानंतर गुन्हा दाखल होणार आहे,असे पोलिसांनी सांगितले. बाबाजी सायकल दुकानात यापूर्वी चारवेळा चोरी झाली आहे. शुक्रवारी रात्री झालेली चोरी पाचव्यांदा झाली आहे. रात्रीची गस्त सुरू करावी अशी मागणी येथील व्यापारी व नागरिकातून मागणी होत आहे.दरम्यान जत शहरात गेल्या महिन्याभरात सुमारे पंचवीस ठिकाणी चोऱ्या झाल्या आहेत. तर गेल्या सहा महिन्याभरात सुमारे शंभरावर दुचाकीची चोरी झाली आहे. आजपर्यत एकाही गुन्ह्याचा छडा लागला नाही.त्यामुळे अनेक चोऱ्यांचे गुन्हे दाखल केले जात नसल्याचे वास्तव आहे.एकाद्या चोऱ्यांच्या घटनेत एखाद्या सामान्य नागरिकांचा जीव गेल्यावर पोलिस सतर्क होणार काय?असा संप्तत सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. जत शहरात गस्त वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.
