चित्रपट : गुलाबजाम ,, कथेच्या पाककृतीत मुरलेला
श्रीखंड, बासुंदी, लाडू, जिलबी गुलाबजाम असे अनेक गोडाचे पदार्थ आपल्या जेवणात अधून–मधून येतातच, प्रत्येकाची आवड वेगवेगळी असू शकते, प्रत्येक पदार्थाची चव वेगळी असते,महाराष्ट्र म्हणजे खाद्यपदार्थाचे माहेरघरच आणि जेवणाची पंगत म्हंटली कि डोळ्यासमोर येते ते रुचकर पदार्थांनी सजवलेलं ताट, माणसाने माणसाशी नाते जोडण्याचा एक महत्वाचा मार्ग म्हणजे ” जेवण ” अन्न हे पूर्ण ब्रह्म ” हे ब्रीद वाक्य आपण लहानपणापासून ऐकतो आहोत. जेवणा मधील गोड पदार्थ ” गुलाबजाम ” ह्या पदार्थाची गंमत अशी आहे कि त्या पदार्थामध्ये पाक मुरावा लागतो. तो पाक पक्का मुरला कि त्याच्या चवीमध्ये अधिक गोडी येते, अश्याच एका ” गुलाबजाम ” कथेची कल्पना घेऊन निर्माते विनोद मलगेवार, विशाल चोरडिया यांनी गोल्डन गेट ह्या चित्रपट संस्थेतर्फे ” गुलाबजाम ” ह्या चित्रपटाची निर्मिती केली असून झी स्टुडीओज चे बिजनेस हेड मंगेश कुलकर्णी यांनी हा सिनेमा प्रस्तुत केला आहे. चित्रपटाची कथा–पटकथा–संवाद सचिन कुंडलकर आणि तेजस मोडक यांचे असून छायाचित्रण मिलिंद जोग यांचे आहे. या चित्रपटासाठी सायली राजाध्यक्ष, श्वेता बापट यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. या मध्ये सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर, मधुरा देशपांडे, चिन्मय उदगीरकर, मोहन घाग, मोहनाबाई असे कलाकार असून प्रत्येकांनी आपापल्या भूमिकेला योग्य तो न्याय दिलेला आहे.
हि कथा आहे लंडन मध्ये नोकरी करणाऱ्या आदित्य नावाच्या मुलाची, आणि पुण्यामध्ये डबे बनवून देणाऱ्या राधा आगरकर ची, आदित्य हा लंडन मध्ये एका मोठया कंपनी मध्ये मोठया पदावर काम करीत असतो, लंडन मध्ये महाराष्ट्रीन पदार्थ देणारे हॉटेल त्याला सुरु करावयाचे आहे, एक दिवस त्याला मुंबईला त्याचे आई–वडील बोलवून घेतात आणि त्याचा नेहा नावाच्या मुलीबरोबर साखरपुडा उरकून टाकतात, आदित्यला त्याची कल्पना सुद्धा नसते, तो लंडन ला जायला निघतो पण लंडन ला न जाता तो पुण्याला त्याच्या मित्राकडे येऊन रहातो, कारण त्याला महराष्ट्रीयन पद्धतीचा मराठी स्वयंपाक शिकायचा असतो, त्याचे मित्र राधाबाईंच्या कडून डबे मागवून खात असतात, आदित्य सुद्धा ते जेवतो, त्यांनी बनवलेला गुलाबजाम त्याला खूप आवडतो, लहानपणची आठवण त्याला होते, त्याला ते जेवण खूप आवडते, आणि तो ठरवतो कि राधाबाई कडून जेवणाचे धडे घ्यायचे, तो राधा आगरकर यांच्या घरी जातो आणि मला तुम्ही स्वयंपाक शिकवा असे सांगून त्यांचा पिच्छा पुरवतो.
एक दिवस राधाबाई आजारी पडतात त्यावेळी आदित्य संपर्ण स्वयंपाक करतो आणि त्यांना जेवायला वाढतो, राधाबाई काहीश्या विक्षिप्त वागत असतात, एक दिवस त्या आदित्यला आपली कथा ऐकवतात, बहिणीच्या साखरपुडा च्या दिवशी त्यांना मोठा अपघात होतो आणि त्या सुमारे अकरा वर्षे बेशुद्ध होऊन रहातात, अर्थात त्या संपूर्णपणे कोमात गेलेल्या असतात, त्यावेळी त्यांची स्मृती नष्ट होऊन जाते मागील काहीच त्यांना आठवत नाही पण देवाच्या दयेने फक्त स्वयंपाक करण्याचे त्यांच्या स्मृतीत रहाते, त्यामुळे त्यांना स्वयंपाक शिवाय काहीच येत नाही,त्यांना व्यवहार ज्ञान नसते, आदित्य त्यांना सांभाळतो, कालांतराने आदित्यला लंडन ला जावेच लागणार असते, त्यावेळी राधाबाई यांची अवस्था बिकट होते, पण आदित्यने त्यांची सोय केलेली असते.
कथा खूप छानपणे रंगवली असून सोनाली कुलकर्णी यांनी राधाबाई आगरकर ह्या भूमिकेचे विविध पैलू सहजतेने साकारलेले आहेत, सिद्धार्थ चांदेकर ने आदित्यच्या भूमिकेला न्याय दिलेला आहे, सोबत मधुर देशपांडे, चिन्मय उद्गीकर, महेश घाग, मोह्नाबाई यांनी उत्तम साथ दिली आहे, दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी चित्रपटाची गती उत्तम राखून कथा फुलवीत नेली आहे.एक परिपूर्ण थाळी मध्ये जसे सर्वच पदार्थ आपापली योग्य ती कामगिरी करतात त्याप्रमाणे ” गुलाबजाम ” हा रसपूर्णतेने भरलेला आहे.
शेवटी आदित्यला राधाबाई स्वयंपाक शिकवतात का ? आदित्यचे आणि नेहाचे पुढे काय होते ? आदित्य लंडन ला गेल्यावर आपल्या हॉटेल चे नाव कोणते ठेवतो ? राधाबाई ला आपला जोडीदार कसा आणि कुठे मिळतो ? अश्या अनेक भावनिक प्रश्नांची उत्तरे आपणास गुलाबजाम मध्ये मिळतील . स्वयंपाककला आणि त्यावरती चित्रपट हि कल्पनाच खूप सुंदर आहे, ह्या वरची ” पाक कथाकृती ” इतकी छान मिळून आली आहे त्यामुळे ” गुलाबजाम ” चा आस्वाद घ्यायला हरकत नाही.
दीनानाथ घारपुरे [ मनोरंजन प्रतिनिधी ] ९९३०११२९९७

