नाटक ” अंदाज आपला आपला ,, मनोरंजन आपले आपले ,,
अंदाज ह्या शब्दामध्येच सारे काही दडलेलं असतं, आपण केलेलं निदान ते ” निदान ” बरोबर यावे यासाठी अंदाज बांधावा लागतो. म्हणजे पुन्हा जर / तर चे प्रश्न उभे राहतात, असे बरेचसे अंदाज आपले बरोबर येतात, हीच जीवनामधील गंमत आहे. प्रत्येकजण पुढचा विचार करताना आपल्या अभ्यासानुसार नक्की काय करायचे याचे ठोकताळे / अंदाज बांधत असतो, त्याप्रमाणे कामाची आखणी करतो कधी–कधी मनाशी बांधलेले अंदाज चुकतात, मग त्यावर प्रश्न निर्माण होतात आणि मग त्याची उत्तरे आपण आपल्याशीच शोधण्याचा प्रयत्न करतो. आपल्यावर संकट आले कि आपण ज्योतिषाकडे धाव घेतो. असे कसे झाले ? पुढे काय होणार ह्याची विचारणा करतो, ज्योतिषी सुद्धा आजूबाजूचा विचार करून कुंडली पाहून ” अंदाज ” सांगतो. हाच धागा पकडून लेखक राजेश कोळंबकर यांनी लिहिलेलं ” अंदाज आपला आपला ” हे नाटक निर्माते विनय गोपाळ अलगिरी, किशोर सावंत, विवेक नाईक यांनी वेद प्रोडक्शन निर्मित किवी प्रोडक्शन या नाटयसंस्थे तर्फे सादर केलं आहे. दिगदर्शन संतोष पवार यांचे लाभले आहे. नेपथ्याची बाजू प्रदीप मुळ्ये यांनी सांभाळलेली असून प्रकाश योजना विनायक तांबे, किशोर इंगळे यांची आहे. संगीत साई पियुष यांचे असून वेशभूषा अंजली खोबरेकर यांची आहे. या मध्ये माधवी गोगटे, अक्षय केळकर, मधुरा देशपांडे, संतोष पवार या कलाकारांच्या भूमिका आहेत.
ज्योती माळगावकर ह्या ज्योतिष जाणणाऱ्या बाई, आपल्या पतीच्या निधनानंतर त्यांचा हा व्यवसाय त्या पुढे सांभाळीत असतात. खराडे नावाचे गृहस्थ त्यांना ह्या कामी मदत करीत असतात. ज्योती बाईंना गुणप्रिया नावाची एक मुलगी, ती कॉलेजमध्ये जाणारी, पण तिचा ज्योतिषावर विश्वास नाही, त्यामुळे माय – लेकी मध्ये खटके उडतात. आपला हा व्यवसाय कोणीतरी पुढे सांभाळायला हवा असे वाटत असताना त्यांच्या दारात समीर नावाचा मुलगा ज्योतिष शिकण्यासाठी येतो. खराडे ज्योतीबाईंना सल्ला देतात त्याला ज्योतिष शिकवा आणि जावई करून घ्या. ज्योतिष शिकताना तो प्रश्नावर प्रश्न त्यांना विचारतो, त्या सुद्धा त्याच्या प्रश्नाला उत्तरे देतात, गुणप्रिया आणि समीर हे एकमेकांना पसंत करतील अशी आशा त्यांना असते. गुणप्रिया ज्योतिष पेक्षा विज्ञानाला महत्व देते. ग्रह, तारे, कुंडली या विषयी अनेक प्रश्न ती विचारते. हे सारे खुमासदारपणे गंमतीदारपणे मनोरंजन करीत मांडले आहे. विज्ञान आणि ज्योतिष हे आपापल्या जागी योग्य आहे.

शेवटी समीर आणि गुणप्रियाचे एकमेकांशी पटते का ? समीरला ज्योतिष शास्त्रात खरंच रस असतो का ? त्याचे प्रश्न नेमके काय शोधत असतात ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे मनोरंजकतेने नाटकात मिळतील.माधवी गोगटे यांची ज्योती ची भूमिका, अक्षय केळकर यांची समीरची भूमिका, तसेच मधुरा देशपांडेची गुणप्रिया ह्या भूमिका त्यांनी खूप छान रंगवल्या आहेत, पण शेवटी संतोष पवार ची खराडे ची भूमिका हि धमाल उडवून देते, विनोदाचे टायमिंग, संवादफेक, आणि भूमिकेला साजेशी असलेली देहबोली लक्षांत रहाते.
एकूण काय तर अंदाज आपला आपला म्हणजे मनोरंजन आपले आपले ,,,,,
दीनानाथ घारपुरे [ मनोरंजन प्रतिनिधी ] ९९३०११२९९७
