जाडरबोबलादला स्काऊट-गाईडचा जिल्हा मेळावा
जत,(प्रतिनिधी);
सांगली जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि सांगली जिल्हा स्काऊट- गाईड संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्हा स्काऊट- गाईड मेळावा जत तालुक्यातील जाडरबोबलाद येथे 16 ते 18 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती तम्मणगौडा रवी-पाटील व गटशिक्षणाधिकारी बी.एन.जगधने यांनी दिली.

जाडरबोबलाद येथील श्री गजानन हायस्कूलच्या पटांगणावर 2017-18 या शैक्षणिक वर्षातील स्काऊट-गाईड आणि कब-बुलबुल जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्याला जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 120 पथके दाखल होणार आहेत. तीन दिवस चालणार्या मेळाव्यात भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल चालणार असून शेकोटी कार्यक्रम,बिनभांड्याचा स्वयंपाक, साहसी खेळ शोभायात्रा, तंबू निरीक्षण, उदबोधन वर्ग, विविध स्पर्धा असे कार्यक्रम होणार आहेत. गजानन हायस्कूलचे मुख्याध्यापक सी.एस. रवी-पाटील आणि तालुक्यातील केंद्रप्रमुख हा मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी झटत आहेत. या निमित्ताने स्काऊट-गाईड जिल्हा मेळावा तालुक्यात प्रथमच होत आहे, असेही श्री.रवी-पाटील म्हणाले.
यावेळी प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे, शिक्षण विस्ताराधिकारी आर.डी. शिंदे, मेळाव्याचे तालुका समन्वयक, केंद्रप्रमुख बसवराज बडिगेर आदी उपस्थित होते.