माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मातोश्री श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील यांचे दुःखद निधन

0

इस्लामपूर, प्रतिनिधी: माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मातोश्री श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील (वय-95) यांचे मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी दुपारी 1.45 वाजता दुःखद निधन झाले. गेल्या 2 आठवड्यापासून या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने वाळवा तालुक्यासह सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली असून वाळवा तालुक्यातील विविध संस्था,शाळा,कॉलेज,तसेच गावा-गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून आईसाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या पार्थिवावर कासेगाव (ता.वाळवा) येथे शनिवारी सकाळी अंत्यविधी केला जाणार आहे. त्यांचा जन्म 1922 साली सातारा जिल्ह्यातील चरेगाव येथील  कृष्णराव माने यांच्या शेतकरी कुटुंबात झाला होता. 1 भाऊ 4 बहिणी असा परिवार होता. त्यांचा लोकनेते राजारामबापू पाटील यांच्याशी 26 मे 1946 रोजी अत्यंत साध्या आणि गांधी पद्धतीने विवाह झाला. त्यांनी स्व.बापूंना राजकिय, व सामाजिक वाटचालीत मोलाची साथ दिली असून बापूंसोबत त्यांनी 38 वर्षे संसार केला. त्या आदर्श गृहिणी होत्या. बापूंच्या अकाली निधनानंतर त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कुटुंब सावरण्याची जबाबदारी पार पाडली. त्यांचा स्वभाव अत्यंत शांत,प्रेमळ होता. त्या ‘आईसाहेब’ या नावाने सुपरिचित होत्या. त्या मुंबई,अथवा राजरामनगर येथे वास्तव्यास असताना  आपल्या घरी आलेल्या माणसांची आस्थेवाईकपणे चौकशी करीत असत. नुकताच त्यांच्या कुटुंबियांनी एकत्र येऊन कासेगाव येथील पदयात्रीमध्ये त्यांचा 95 वा वाढदिवस साजरा केला होता.

          त्यांच्या पश्चात उद्योजक भगतदादा पाटील, आ.जयंतराव पाटील हे दोन मुलगे,आणि राहुरीच्या माजी नगराध्यक्ष डॉ सौ.उषाताई प्रसाद तनपुरे, सौ.विजया फत्तेसिंग जगताप (शिवाजीनगर, पुणे), सौ.नीलिमा नरेंद्र घुले-पाटील (अहमदनगर) या ३ विवाहित मुली,तसेच सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

Rate Card

         उद्या (शनिवार) सकाळी 8 वा.कासेगाव (ता. वाळवा) येथे त्यांचे पार्थिव आणण्यात येणार असून, येथील आझाद विद्यालयाच्या प्रांगणात 9.30 वाजेपर्यंत दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. यानंतर त्यांच्या घरी धार्मिक विधी करून 10.30 वाजता अंत्ययात्रा सुरू होईल. त्यांच्या पार्थिवावर येथील कृष्णा नदीच्या तीरावरील स्मशान भूमीत 11 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.