जत तालुक्यातील अारोग्य केंद्रांनाच सलाईन लावण्याची वेळ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा कामचुकार पणा वाढला : ग्रामीण रुग्णाचे उपचारासाठी बेहाल
जत,प्रतिनिधी: वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता, अनियमितता, औषधांचा तुटवडा, स्वच्छतेचा अभाव व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ढासळलेले नियंत्रण… या सर्वांमुळे जत,माडग्याळ रुग्ण्यालयासह तालुक्यातील आरोग्य केंद्राची दर्जा ढासळतोय. प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य रुग्णांची परवड सुरू आहे. सर्वसामान्य रुग्णांच्या जीवन-मरणाशी निगडित असलेल्या रुग्णालये, आरोग्य केंद्रात ढिसाळ कारभाराचा पंचनामा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
रुग्णांना चांगली सेवा देण्यात एकेकाळी आघाडीवर असलेल्या जत तालुक्यातील अारोग्य केंद्रांनाच सलाईन लावण्याची वेळ आली आहे. केसपेपर काढण्यापासून सुरू झालेला रुग्णाच्या कुटुंबीयांचा संघर्ष केंद्रातून बाहेर पडेपर्यंत सुरूच असतो. सध्या रुग्णांना एक ना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.जत व माडग्याळ ग्रामीण रुग्णालयातील परिस्थितीही कायम आहे. अशा स्थितीमुळे ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा दर्जा उंचावला. केंद्रासह रुग्णालयाची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. गंभीर रुग्णांना ‘ससून’ची वाट दाखवली जात आहे.
आता रुग्णाला कुठे पाठविणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. केसपेपर विभागापासूनच रुग्णांना झगडावे लागत आहे. वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसतात, असले तरी औषधे नसतात, शस्त्रक्रियां होत नाहीत. अशी बाह्यरुग्ण विभागाची अवस्था आहे. आयुष विभागाच्या औषध उपलब्धतेकडेही लक्ष दिले जात नाही. रुग्णालयाच्या स्वच्छतेकडे पुरेसे लक्ष दिसत नाही. अपघातातील जखमी तसेच अन्य गंभीर रुग्णांना तातडीने योग्य उपचार मिळत नाहीत.अनेक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य केंद्रातील फोन नॉट रिच्याबल असतात. त्यामुळे उपचाराची परवड नित्याची बनली आहे.
कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे सर्वांमध्येच कामाच्या पातळीवर निरुत्साहाचे वातावरण आहे. अशा अनेक प्रश्नांनी ग्रामीण रुग्णालयासह तालुक्यातील आरोग्य केंद्राना घेरले आहे. अशा स्थितीत वरिष्ठ अधिकारी एकमेकांकडे बोट दाखण्यात धन्यता मानत आहेत. चुकणाऱ्यावर कडक कारवाई होत नाही. काम करणाऱ्यावरच अधिक बोजा पडत आहे.जिल्हा,तालुका प्रशासनाचे रुग्णालये व केंद्रावरील व्यवस्थापन नियंत्रण पूर्णत: हरविले आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयांची वाट धरावी लागत आहे. या सर्वांचा लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.

चौकट
…ही आहे वस्तुस्थिती
अनेक आरोग्य केंद्रातवैद्यकीय अधिकारी नेहमी गैरहजर असतात. अनेक वेळा औषधांचा तुटवडा जाणवतो.स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते.बऱ्याच वेळा अधिकारी केंद्रात उपस्थित नसतात. मोबाईल फोनवरून संपर्क साधायचा म्हणलं तरी केंद्रासह वैद्यकीय अधिकाऱ्यांचे फोन नॉट रिच्याबल असतात.
