स्त्यावरील खड्डेमुक्ती : मंत्र्यांची घोषणा हवेतच

0
Rate Card

जत,प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली. मात्र, तरीही अनेक रस्त्यांवर खड्डे कायम आहेत. जत तालुक्यातील विविध रस्त्यांची खड्ड्यातून मुक्तता होत नसल्याने  हे वास्तव समोर आले. अनेक रस्त्यांवर अद्यापही मोठमोठे खड्डे असून, यातून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे मंत्र्यांची घोषणा हवेतच विरल्याचे दिसून
येत आहे.सगळ्यात खड्डेमय रस्त्याचे जिंवत उदाहरण विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्ग आहे. येथे खड्ड्यामुळे रस्ताच शिल्लक राहिला नाही. पुर्व भागातील अनेक रस्त्याची अशीच स्थिती आहे.
महाराष्ट्रातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करू ही घोषणा केवळ घोषणाच ठरली आहे. जत तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक रस्ते आजही खड्डेमय आहेत. तर जे खड्डे मोठा गाजावाजा करून बुजवले ते देखील योग्य पद्धतीने बुजविले न गेल्याने ते पुन्हा उखडले असल्याचे निदर्शनास आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांकडून जतेतील रस्ते खड्डेमुक्त होतील, अशी नागरिकांची अपेक्षा असताना अपेक्षाभंग झाला आहे. तालुक्यातील अनेक प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले. मात्र हे काम म्हणजे दगडापेक्षा विट मऊ असे झाले आहे. खड्डे भरले गेले असले तरी ते काम योग्य प्रकारे न झाल्याने वाहने चालविताना त्रास जाणवत आहे. खड्डे भरताना ते रस्त्याला समांतर भरले न गेल्याने काही ठिकाणी खोलगटपणा तर काही ठिकाणी उंचवटा तयार झाला आहे. लहान आकाराचे अनेक खड्डे तसेच आहेत. काही रस्त्यांवर खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले. मात्र काम इतके हलक्या दर्जाचे आहे की पुढे खड्डे बुजवले जातात व मागे ते उखडले जात आहेत. जतेतील रस्ते कामाकरिता कोट्यवधींचा निधी मंजूर झाला, पण पाठपुरावा व इच्छाशक्ती अभावी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे तालुक्यातील रस्त्यांकडे झालेले दुर्लक्ष यामुळे आजही अनेक रस्ते खड्डेमय पहायला मिळत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.