वाहतूक कोंडीसाठी पंचायत समितीच्या चालकांचे सहकार्य
जत,वार्ताहर: जत येथील यल्लमा देवीच्या यात्रेच्या कालावधीत वाचनालय चौकात वाहतूकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. वाचनालय चौकात चारही रस्ते एक ठिकाणी एकत्रित येतात. या चौकातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी एकच वाहतूक पोलिसाची व्यवस्था करण्यात आली होती.मात्र भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांनाही मर्यादा पडत होत्या.ही परिस्थिती पाहून मोठी झालेली वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी जत पंचायत समितीच्या वाहनाचे चालक विनायक नाटेकर हे धाऊन आले,त्यांनी वाहतूक व्यवस्था अत्यंत सुरळीत करण्यास मोलाची मदत केली.त्यामुळे वाहनधारकांना व भाविकांना वाहतूक कोंडीतून सुटका झाली. त्यांच्या या मोलाच्या योगदानाबद्दल जत शहरातून कौतुक होत आहे.
जत शहरात प्रसिद्ध यल्लमा देवीची यात्रा मोठ्या प्रमाणात भरली जाते. मोठ्या संख्येने भाविक कर्नाटक, आंध्रप्रदेश व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून येतात. जतमधील वाचनालय चौकात वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी एकच वाहतूक पोलिस उपलब्धं होते. चारही रस्ते एकाच ठिकाणाहून जात असल्याने वाहतूकीची मोठी गर्दी व कोंडी झाली.

यावेळी या चौकात जत पंचायत समितीमध्ये शासकीय वाहनावर चालक म्हणून कार्यरत असणारे विनायक नाटेकर उपस्थित होते. त्यांनी ही वाहनांची गर्दी व वाहतूक कोंडी पाहिली. लगेच त्यांनी एकच वाहतूक पोलिस उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांस सहकार्य करीत वाहतूक सुरळीत करण्याचे सुरू केले. मंदिराकडून येणारी वाहने थोरल्या वेशीतून शिवाजी चौकाकडे वळवली. तर काही वाहने किस्मत चौकाकडे सोडली. यासाठी नाटेकर या चौकात काही तास थांबून होते. शिवाय वाचनालय चौकातून धाव घेत धानेश्वरी काँलनी येथे थांबून काही वाहने विद्यानगर मार्गे सांगली रस्त्याला सोडन्यास मोलाचे सहकार्य केले.
मोठी लांबत जाणारी वाहतूक कोंडी व पर्यायाने होणारे भाविकांचे हाल नाटेकर यांच्या मुळे काहीप्रमाणात थांबले. त्यांच्या या आपत्कालीन केलेल्या मदतीबद्दल भाविकांतून व नागरीकातून कौतुक होत आहे.
