राजारामबापू पाटील कारखान्याचा प्रतिटन 3006 रू. पहिला हप्ता

0

इस्लामपूर, प्रतिनिधी :राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात कारखान्याकडे गळीतास आलेल्या व येणाऱ्या उसास प्रतिटन रक्कम रु.3 हजार 6 इतका पहिला हप्ता जाहीर केला. राजारामबापू सह.साखर कारखान्याचे चेअरमन पी.आर. पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून ही माहिती दिली. यावेळी श्री.पाटील यांनी केंद्र शासन फक्त ग्राहकांचा विचार करीत असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा अजिबात विचार करीत नसल्याचे सांगत साखर  उद्योगाबद्दल चिंता व्यक्त केली. 

       श्री.पाटील म्हणाले,आमच्या साखराळे,वाटेगाव-सुरूल शाखा व कारंदवाडी युनिटकडे गेल्या वर्षी गाळपास आलेल्या उसाच्या साखर उताऱ्यावरून आमच्या तिन्ही युनिटचा एकत्रित निव्वळ रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) रु.2 हजार 895 व 61 पैसे प्रतिटन असा आहे. तो आम्ही रु.2 हजार 896 धरून,त्यामध्ये अधिक रु.110 असा एकूण रु.3 हजार 6  पहिला हप्ता देण्याचा आमचा संचालक मंडळाने निर्णय घेतलेला आहे. ऊस गळीतास आल्यानंतर दर पंधरवड्यास शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पेमेंट वर्ग केले जाईल.

         आम्ही माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली साखराळे युनिटमध्ये 2 लाख 92 हजार 385 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 3 लाख 37 हजार 350 क्विंटल साखरेचे उत्पादन,तर वाटेगाव-सुरूल शाखेत 1 लाख 89 हजार 165 मे.टन ऊसाचे गाळप करून 2 लाख 16 हजार 100 क्विंटल साखरेचे उत्पादन ,तसेच कारंदवाडी युनिटमध्ये 1 लाख 40 हजार 300 हजार मे.टन गाळप करून 1 लाख 60 हजार 550 क्विंटल साखर उत्पादन घेतलेले आहे. यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगले गाळप चालू असून 2 लाख 8 हजार मेट्रिक टन ऊसाचे जादा गाळप केलेले आहे. मी याबद्दल ऊस उत्पादक शेतकरी,संचालक मंडळ, कामगार,अधिकारी,तसेच तोडणी व वाहतूक मजुरांचे आभार मानतो. आम्ही या वर्षी साखराळे युनिटमध्ये 10 लाख,वाटेगाव-सुरूल युनिटमध्ये साडेपाच लाख,तर कारंदवाडी युनिटमध्ये साडेचार लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चितपणे गाठू.

Rate Card

        श्री.पाटील साखर उद्योगाच्या सद्य स्थितीबद्दल भाष्य करताना म्हणाले,कोल्हापूर येथे एफआरपीचा निर्णय घेतला,त्यावेळी साखरेस रु.3 हजार 650 प्रति क्विंटल दर होता. आता हा दर रु.400 ने खाली आला असून दर टेंडरला तो 40- 50 रुपयांनी खाली घसरत आहे. ही चिंताजनक बाब आहे. केंद्र शासन फक्त ग्राहकांचा विचार करते,मात्र ते ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करायला तयार नाही. मध्यंतरी इस्मा या संस्थेने केंद्रीय कृषीमंत्री,अन्नपुरवठा मंत्री,तसेच देशाचे पंतप्रधानाना भेटून वस्तुस्थिती मांडली आहे. मात्र फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. केंद्र शासनाने तातडीने पूर्वीच्या आघाडी सरकारप्रमाणे साखर निर्यातीस अनुदान जाहीर करायला  हवे,आणि यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व सहकार मंत्र्यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न करायला हवेत.तसेच 20 टक्के एक्स्पोर्ट ड्युटीही काढून टाकायला हवी. तरच साखर उद्योग सावरू शकतो.

     यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील,संचालक विराज शिंदे,श्रेणीक कबाडे,एल.बी. माळी,कार्यकारी संचालक आर.डी.माहुली,फायनान्स मॅनेजर अमोल पाटील,व्ही.बी.पाटील,जयकर फसाले, विश्वनाथ पाटसुते प्रामुख्याने उपस्थित होते.

        

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.