नागनाथअण्णांच्या तेजातून देशभक्तीची, वंचितांसाठी, सामान्यांसाठी काम करण्याची प्रेरणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

नागनाथअण्णांच्या तेजातून देशभक्तीची,

वंचितांसाठी, सामान्यांसाठी काम करण्याची प्रेरणा

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– वाळव्यात इथेनॉल प्रकल्प आणि राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

– नागनाथअण्णा स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 16 कोटी रुपये निधी

– नागनाथअण्णांनी मूल्याधिष्ठीत समाजकारण केले

सांगली, दि. 25 (जि. मा. का.) : देशाच्या स्वातंत्र्याचे बीजारोपण झालेल्या क्रांतीवीरांच्या भूमिला माझा प्रणाम आहे. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या भूमीत येऊन, त्यांच्या स्मारकाला अभिवादन करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्यासोबत नागनाथअण्णांनी स्वातंत्र्यलढ्यात सहकुटुंब तेजस्वीपणे लढा दिला. सशस्त्र क्रांतीचा लढा उभारला. त्यांया समाधीचे दर्शन घेऊन त्यातून मिळालेल्या तेजातून देशभक्तीची, वंचितांसाठी, सामान्य माणसांसाठी काम करण्याची प्रेरणा आपणास मिळाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्यामधील इथेनॉल प्रकल्प आणि राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. हुतात्मा किसन अहिर विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील होते.

नागनाथअण्णा नायकवडी यांच्या स्मारकासाठी राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात चार कोटी रुपये दिले आहेत. दुसऱ्या टप्प्यासाठी 16 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाईल. या माध्यमातून राज्य शासन नागनाथअण्णांच्या कार्याच्या, चांगल्या माणसांच्या आणि चांगल्या कार्याच्या मागे समर्थपणे आणि ताकदीने उभा राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

यावेळी सहकारमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार विलासराव जगताप, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, माजी मंत्री व आमदार डॉ. पतंगराव कदम, आ. मोहनराव कदम, जिल्हाधिकारी वि ना. काळम, वैभवकाका नायकवडी, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा आदि व्यासपीठावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच क्रांतीसिंह नाना पाटील यांच्यासोबत नागनाथअण्णा नायकवडी व या भागातील क्रांतीवीरांनी या भागात स्वातंत्र्याचा पहिला झेंडा रोवण्याचे काम केले. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच इंग्रजांना शह देऊन प्रतिसरकार स्थापन केले आणि देश स्वतंत्र झाल्यानंतरही त्यांनी मूल्याधिष्ठीत समाजकारण केले. समाजासाठी स्थापन केलेल्या कारखान्यात त्यांनी प्रवेश केला नाही. तसेच, जनता अध्यक्ष करेल म्हणून कारखान्याचे सभासदही झाले नाहीत. हे सर्व देशाचे आहे, समाजाचे आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी हा कारखाना चालवावा, ही भूमिका त्यांनी घेतली. इदं न मम् राष्ट्राय स्वाहा: हा आदर्श नागनाथअण्णांनी आपणा सर्वांसमोर ठेवला आहे. ही परंपरा वैभव नायकवडी पुढे चालवत आहेत, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

एफआरपीमधील वाढ, 70:30 फॉर्म्युला यांचा दाखला देऊन राज्य शासनाचा शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहण्याचा प्रयत्न आहे, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कारखान्याच्या नफ्याचा हिस्सा शेतकऱ्याला मिळावा, यासाठी 70: 30 हा फॉर्म्युला स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. ज्या ज्या वेळी अडचणी आल्या तेव्हा राज्य शासनाने पुढाकार घेऊन साखर कारखान्यांना मदत केली आहे. हुतात्मा कारखान्याने उत्तम काम केले आहे. असे काम केल्यास शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन होणार आहे, असे ते म्हणाले.

Rate Card

वैभव नायकवडी यांचा वाढदिवस 21 नोव्हेंबर रोजी होता. त्यानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पद्मभूषण क्रांतीवीर  नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याचा शेतकरी, सामान्य माणूस त्याचा मालक असून, वैभव नायकवडी तो विश्वस्त, सेवक या नात्याने, सचोटी आणि प्रामाणिकपणे चालवत आहेत. त्यामुळेच कुठलाही उपपदार्थ नसताना देशात सर्वाधिक विक्रमी एफआरपी देणे त्यांना शक्य झाले आहे. अशा कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल समाधान असल्याचे ते म्हणाले.

कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कबड्डी हा राष्ट्रीय खेळ आहे. क्रीडा स्पर्धेमधून सदृढ शरीर आणि उत्तम मन तयार होण्याबरोबरच संघभावना निर्माण होते. टीम स्पिरीट तयार होते. जिथे संघभावना तयार होते, तिथे आयुष्यात कधीच मागे वळून बघण्याची गरज पडत नाही, असे सांगून त्यांनी स्पर्धेत सहभागी खेळाडुंना शुभेच्छा दिल्या.

पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्यामधील इथेनॉल प्रकल्पामुळे ऊस उत्पादकांना चांगला दर मिळेल, असा विश्वास व्यक्त करून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कुठलाही उपपदार्थ नसताना केवळ साखरेवर ऊस उत्पादकाला सर्वाधिक दर देणारा हा कारखाना आहे. देशातील सर्वोत्तम चालणाऱ्या 25 साखर कारखान्यांच्या यादीत या कारखान्याचे नाव अग्रेसर आहे. साखर कारखान्याप्रमाणे इथेनॉल प्रकल्पही काटेकोरपणे चालवावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

नागनाथअण्णा नायकवडी यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि विचारातून चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे स्पष्ट करून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, साखरेचे दर पडले तरी साखर कारखान्यांना मदत करून एफआरपी द्यायला भाग पाडायचे. या भावनेतून राज्य शासनाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी 2400 कोटी रुपयांचे कर्ज साखर कारखान्यांना दिले. आगामी पाच वर्षात राज्य शासन या रकमेचे व्याज भरणार आहे. ही रक्कम जवळपास 1100 कोटी रुपये आहे, असे ते म्हणाले.

युवकांच्या हातात देशाचे भवितव्य आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत राष्ट्रासाठी कार्य केलेल्या नागनाथअण्णांचा आदर्श युवकांनी घ्यावा, असे सांगून पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, राज्य शासन जलयुक्त शिवार योजनेसारखी महत्त्वाकांक्षी योजना राबवत आहे. त्याचबरोबर ठिबक सिंचन योजनेसाठी राज्य शासन मदत करत आहे. या ठिकाणी सहकार तत्त्वावर रूग्णालय उभे करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रारंभी मान्यवरांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

प्रास्ताविकात वैभव नायकवडी यांनी नागनाथअण्णा नायकवडी यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, हुतात्मा साखर कारखाना, इथेनॉल प्रकल्प यांची माहिती देऊन वीजनिर्मिती प्रकल्पास मान्यता द्यावी, असे आवाहन केले. सूत्रसंचालन प्रा. राजा माळगी यांनी केले. आभार प्रा. बाळासाहेब नायकवडी यांनी मानले.

यावेळी अतुलबाबा भोसले, राजेंद्र अण्णा देशमुख, पृथ्वीराज देशमुख गोपीचंद पडळकर, कुसुम नायकवडी, प्रा. सुषमा नायकवडी, वीरधवल नायकवडी, गौरव नायकवडी, नंदिनी नायकवडी यांच्यासह राज्यभरातून आलेले खेळाडू, शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन

हुतात्मा  कारखान्याच्या प्रतिदिन 30000 लिटर क्षमतेच्या इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हा प्रकल्प  प्रतिदिन 30000 लिटर क्षमतेचा असून प्रकल्पांतर्गत मेन डिस्टीलरी प्लॅन मध्ये रेक्टीफाईड स्पिरीट व इथेनॉल  निर्मिती जरुरीप्रमाणे व किफायतशीररित्या  करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार इथेनॉल हे पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी  हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम किंवा इंडियन ऑईल या ऑईल मार्केटींग कंपन्यांना दिले जाते. सध्या इथेनॉल मिक्सिंगसाठी  केंद्र सरकारने इथेनॉल हे ग्रीन फ्युएल म्हणून पेट्रोलियम कंपन्यांना पेट्रोलमध्ये समावेश करण्यासाठी पुरवठा करण्याची कारखान्यास नुकतीच मंजूर दिली आहे.या इथेनॉल प्रकल्पाचा आराखडा हा विचारपूर्वक केलेला असून पर्यावरणाशी पूरक सुरक्षिततेच्या  दृष्टीने प्लॅन्टची रचना व उत्तम सांडपाणी निर्मूलन व्यवस्था इत्यादी बाबत विशेष काळजी घेतलेली आहे.    बायोगॅस प्लॅन्ट, इव्हापोरेशन प्लॅन्ट व कम्पोस्टींग  सिस्टीम 15 एकर जागेमध्ये केली असून असे तीन प्लॅन्ट आसवणी (डिस्टीलरी) प्रकल्पांतर्गत उभारलेले आहेत.

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

दरम्यान, हुतात्मा शिक्षण व उद्योग समुह वाळवा आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने  44 वी कुमार /कुमारी  राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2017 वाळवा येथे 25 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत आहे. या स्पर्धेचे ध्वज फडकवून, क्रीडाज्योत प्रज्वलित करून व हवेत फुगे सोडून मान्यवरांच्या हस्ते  उद्घाटन करण्यात आले. यावेळी वीरधवल नायकवडी यांनी खेळाडुंना शपथ दिली. या स्पर्धेत 20 वर्षांच्या आतील मुले आणि मुलींचा संघ असे मिळून 800 खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांना अभिवादन

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांनी पद्मभूषण क्रांतीवीर  नागनाथअण्णा नायकवडी यांच्या समाधीस्थळी त्यांच्या स्मारकाला पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केले. तसेच, नागनाथअण्णांचे वास्तव्य असलेल्या साखर शाळेस तसेच हुतात्मा बझारला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांनी भेट दिली.

00000

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.