डिजिटल शिक्षणात हरवतेय सुलेखनाची कला !

0

  • जत,प्रतिनिधी : सुंदर हस्ताक्षर काढण्याची कला ज्याला प्राप्त असते, त्याचे सर्वजण कौतुक करत असतात. या उलट ज्याचे हस्ताक्षर खराब असेल त्याची प्रतारणाही जास्त प्रमाणात केली जाते. आताच्या काळात सुंदर हस्ताक्षराची कला ही नाहीशी होऊ लागली आहे. खासगी व प्राथमिक शाळांमधून देण्यात येणाऱ्या डिजीटल शिक्षणामुळे सुलेखनाचे प्रमाण कमी झाले आहे.कॉप्युटर व मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचेही हस्ताक्षर सुंदर येईनाशे झाले आहे. परिणामी डिजीटल शिक्षणामुळे सुलेखनाची कला ही नाहीशी होवून लागली आहे.सुंदर हस्ताक्षर काढण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून बालवाडी, प्राथमिक शाळेपासूनच शिक्षण दिले जाते. बदलत्या काळाप्रमाणे आज बॉलपेन, जेलपेनने फाऊटनपेनची घेतलेली जागा तसेच तंत्रज्ञानाच्या वाढलेल्या प्रमाणातून आजच्या पिढीने कंप्युटर व टॅबलेटला जवळ केल्याने सुलेखनाशी नकळत फारकत घेतली आहे. शाळांव्यतिरिक्त पेपरलेस कामकाज केले जात असल्याने आॅनलाईन व्यवस्थेमुळे कागद आणि पेनचे भावनिक नाते संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे. कंप्युटरवरील सततच्या कामामुळे हस्ताक्षर खराब येत असल्याने लिखाणाकडेही दुर्लक्ष होत आहे.सुंदर हस्ताक्षर येण्यासाठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, प्रशिक्षण वर्ग यांचे आयोजन विविध संस्था, सामाजिक संघटना तसेच शाळेतून केले जाते. मात्र, बदललेल्या डिजीटल क्लासरूम व कंप्युटर वापरामुळे विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर हे सुंदर येण्याचे प्रमाण घटले आहे.तर पुर्वीच्या काळात दुरेगी चौरेगी वह्यातून देण्यात येणाऱ्या गृहपाठाचेही प्रमाण कमी झाले आहे. खासगी क्लासेमध्ये शाळेतील सर्व अभ्यास हा शिकविला जात असल्याने शाळेतील शिक्षकही शाळेत मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येते. कंप्युटरवरून मुलांना शिक्षण देण्यात येत असल्याने पाटी अन् पेन्सील व पेन वापराचे प्रमाण कमी होवू लागले आहे.

    मराठीप्रमाणे इंग्रजी हस्ताक्षराबाबतही ओरड असून डॉक्टरांकडून दिल्या जाणाऱ्या औषधांच्या पिस्क्रीप्शनवरील अक्षरही कधी कळत नाही. अक्षर काढण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. मात्र, आजच्या काळात कंप्युटरच्या वापरामुळे मुळची सुलेखनाचे कला ही नाहीशी होवू लागली आहे.

    सुंदर हस्ताक्षर नसल्याने मार्कही कमी !

    मुलांचे अक्षर सुंदर व वळणदार असावे, अशी त्यांच्या पालकांची व शिक्षकांची अपेक्षा असते. परिक्षेचे पेपर हे हातानेच लिहावे लागता. पेपर लिहिताना सुलेखनाची कला असणे आवश्यक असते. कारण प्रश्नांची उत्तरे बरोबर लिहूनही हस्ताक्षर जर निट नसेल तर शिक्षकांना पेपर तपासताना समजत नाही. परिणामी उत्तर बरोबर असूनही मार्क कमी दिले जातात.

    विद्यार्थ्यांच्या हाती टॅब अन् माऊस !

    बदलत्या काळानुसार आता शाळेतील शिक्षण पद्धतीतही सुधारणा झाली आहे. पूर्वी पाटी अन् पेन्सीलच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात होते. आज मात्र, त्याचे प्रमाण कमी झाले आहे. आज डिजीटल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या हातात पाटी, पेन्सील ऐवजी टॅब अन् कंप्युटरचा माऊस आला आहे.

    शिक्षक, पालकांकडून हवे प्रयत्न !

    पूर्वीच्या काळी शाळेतून मुलांना दुरेगी व चौरेगी अशा वह्यातून घरचा अभ्यास म्हणून गृहपाठ दिला जात असे. नंतर बदलत्या काळाप्रमाणे कंप्युटरद्वारे डिजीटरल शिक्षण मुलांना दिले जावू लागले. त्यामुळे मुलांकडून दुरेगी व चौरेगी वह्यातून कमी प्रमाणात लिखाण केले जावू लागले. आज मुलांच्या बिघडलेल्या हस्ताक्षराकडे शिक्षक व पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षक व पालकांमध्ये सुलेखनाच्या कलेविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे.

    सुंदर हस्ताक्षर असणाऱ्याचे होते कौतुक

    आपल्या अवतीभवती अनेक प्रकारची हस्ताक्षरे काढणारे लोक असतात. काही उच्च पदावर काम करणाऱ्या व्यक्तींचे अक्षर सुंदर नसलेकी त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. या उलट ज्याचे हस्ताक्षर सुंदर व सुस्पष्ट आणि वळणदार असेल त्याचे सर्वचजन कौतुक करत असतात.

Rate Card
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.