‘स्टॉप कॅन्सर’ची जनजागृती
कर्करोग अर्थात कॅन्सर आपल्या देशात थैमान घालायला लागला आहे. 2008 मध्ये हा आपल्या देशात आठव्या क्रमांकावर होता, आज तो दुसर्या स्थानावर आहे. 200 प्रकारचे कर्करोग लोकांना होतात. प्रत्येक तिसर्या माणसाला कर्करोग गाठत असून सगळ्यात वेगाने हा रोग आपल्या देशात फैलावत चालला आहे. वेळीच याला आवर घातला नाही आणि जनजागृतीबरोबरच अॅक्शन प्लॅन राबवला गेला नाही तर घरटी एक–दोन रुग्ण कर्करोगाचे दिसतील. स्टॉप कॅन्सर मिशन मल्टीपर्पज सोसायटीचा कॅन्सर समुपदेशक विजय मानकर सांगत होता, तेव्हा जिरग्याळ(ता.जत) मधल्या प्राथमिक शाळेत कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले शिक्षक अगदी जीव कानात आणून ऐकत होते.नागपुरातली ही सामाजिक संस्था सध्या राज्यभरातल्या शाळांमध्ये जाऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांना कर्करोगाबद्दल जागृतीचे काम करत आहे. मानकर सांगत होता, आम्ही आतापर्यंत राज्यातल्या 30 जिल्ह्यांमधल्या शाळांमध्ये जाऊन कॅन्सरबाबत जागृती करण्याचे काम केले आहे. साम्गली जिल्हा हा शेवटचा जिल्हा राहिला आहे. 13 तारखेला हाही जिल्हा पूर्ण होणार आहे. मात्र तो जी कॅन्सरची आपल्या देशातली भयावस्था सांगत होता,तेव्हा उपस्थितांमध्ये एक प्रकारची भितीची लकेर उमटत होती. शेवटी सर्व शिक्षकांनी आपले कुटुंब या भयानक आजारापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार केला. आपल्या कुटुंबाबरोबरच आपल्या शाळेतल्या मुलांना, त्यांच्या पालकांना जागरूक करू, असाही त्यांनी निश्चय केला.
मानकरच्या बोलण्यातून आणखी एक माहिती उघड झाली ती म्हणजे या रोगाविषयीचा जनजागृतीचा अभाव! त्यांचे म्हणणे 0.1 टक्का फक्त जनजागृती केली जाते.ही आकडेवारी म्हणजे काहीच नाही.म्हनजे आपल्या जागृती पातळीवर फार मोठी मोहीम राबवण्याची गरज आहे. शिवाय ही जागृती केल्यानंतर जी अॅक्शन घ्यायला हवी ती घेतली जात असल्याने या रोगाचा प्रसार वाढला आहे. 10 टक्के जनजागृती झाली तर प्रत्यक्ष कार्यवाही ही 90 टक्के व्हायला हवी कॅन्सर आटोक्यात येणार आहे. मुळात हा रोग होऊ नये,यासाठी अधिक काळजी घेतली पाहिजे. यासाठी वेळोवेळी आपल्या शरीराची संपूर्ण तपासणी करून घ्यायला हवी. कारण या तपासणीमुळे आपल्या शरीरात प्राथमिक अवस्थेत कोणकोणते आजार,रोग आहेत,याची कल्पना येते नी आपण त्याच्यापासूनच्या बचावासाठी प्रयत्न करायला लागतो. कॅन्सर म्हणजेच कर्करोग हादेखील प्राथमिक अवस्थेत असेल तर तो बरा करता येतो. प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराजसिंग, अभिनेत्री मनीषा कोईराला यांना तो बरा करता आला,त्याला कारण म्हणजे हा रोग प्राथमिक अवस्थेत असल्याचे निदान त्यांना लवकर कळले. दुसर्या–तिसर्या टप्प्यात हा रोग गेल्यास वाचण्याचे चान्सेस फारच कमी आहेत.त्यामुळे हा रोग होऊ नये,यासाठी आपली जीवनशैली सुधारली पाहिजेच पण वेळोवेळी तपासण्या या करायलाच हव्यात.
वर आपण पाहिले की, जवळपास 200 प्रकारे कर्क रोग जगभरातल्या लोकांना होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे तो क्लिष्ट आहेच आणि त्यावरचा उपचारही कठीण आणि महागडा आहे. त्यामुळे आपल्याला त्याच्यापासून सावध राहणे,हेच आपल्या भल्याचे आहे. साधारणत:कर्करोग (कॅन्सर) हा धुम्रपान केल्याने आणि तम्बाकूजन्य पदार्थांच्या सेवनाने होतो. मद्यपान केल्याने, शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्याने होतो.खाण्या–पिण्याच्या सवयीदेखील कारणीभूत आहेत.मानसिक तणाव,अॅसिडीटी, अतिप्रखर सूर्य किरणे अशा किती गोष्टींमुळे लोक कॅन्सरच्या विळख्यात सापडतात.या गोष्टी टाळल्या तर आपन यापासून बचावू शकतो.यासाठी आपल्याला महत्त्वाचे म्हणजे आपली जीवनशैली बदलली पाहिजे. शरीर सतत क्रियाशील ठेवण्याबरोबरच आपल्या शरीराला घातक ज्या गोष्टी आहेत,त्या टाळल्या पाहिजेत. त्यापासून दूर राहिले पाहिजे.फास्टफूडला रामराम ठोकला पाहिजे. रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारे अन्नघटक आपल्या शरीरात जायला हवेत, अशी व्यवस्था करायला हवी. योगा,व्यायाम याकडे लक्ष द्यायला हवे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला विचार सकारात्मक ठेवला पाहिजे. चांगला विचार केला पाहिजे, आपल्यासह दुसर्यांचे चांगले चिंतले पाहिजे.निरपेक्ष भावनेने काम करत राहिल्यास चांगला फायदा होतो.
आपल्या देशातील सर्वच वयोगटातील लोकांना कॅन्सर (कर्करोग) होतो. स्त्रिया याला अधिक बळी पडत आहेत.छातीचा,फुफ्फुसाचा आणि गर्भाशयाचा कॅन्सर महिलांमध्ये अधिक प्रमाणात होत आहे. लहान मुलांनाही तो होत आहे. हा रोग काही प्रमाणात अनुवंशिकही आहे. मात्र प्राथमिक अवस्था आपल्या लक्षात आली तर आपण त्याच्यापासून बचाव करू शकतो.त्यामुळे आपल्या शरीराच्या वेळच्यावेळी तपासण्या करायला विसरू नका. आनंदी राहा, सकारात्मक दृष्टीकोन ठेवून वागा, शरीराला घातक असणार्या गोष्टींपासून दूर राहा, म्हणजे हा भयानक कॅन्सर तुमच्या आसपासही फिरकणार नाही.
मच्छिंद्र ऐनापुरे,जत