रावणाची प्रवृत्ती ठेचा

0

रावणाची प्रवृत्ती ठेचा

आज दसरा. अर्थात विजयादशमी. आपल्या भारतीय संस्कृतीचा या  सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक शुभ मुहुर्तांपैकी हा एक दिवस आहे. त्यामुळे आजच्या दिवशी नवनवीन उपक्रमांचा आरंभ करण्याकडे आपल्या लोकांचा कल असतो. पूर्वीच्या काळात शौर्य आणि महत्त्वाकांक्षेचे दर्शन घडविण्यासाठी याच दिवशी पराक्रमी पुरुष सीमोल्लंघनास सज्ज होत असत. प्रगती आणि विज्ञानाभिमुख आधुनिक समाजव्यवस्थेत मात्र देश आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय पराक्रमी तरुण पृथ्वीच्या पाठीवर निर्भयपणे संचार करून बौद्धिक सामर्थ्याच्या बळावर स्वतःबरोबर स्वतःच्या देशाच्या आधुनिक प्रगतीस मौलिक हातभार लावीत आहेत. प्रत्येकाचा अभिमान वाढविणारा पराक्रम गाजविणार्‍या भारतीय युवक-युवतींचे युरोप-अमेरिकेसारख्या प्रचंड वैज्ञानिक प्रगती व खर्‍याखुर्‍या लोकशाहीवादी समाजव्यवस्थेकडे यशस्वीरीत्या वाटचाल करणार्‍या देशातील कर्तृत्व पाहून तेथील राज्यकर्ते, समाजधुरिण आणि वैज्ञानिक देखील अक्षरशः चकित होत आहेत. युवाशक्तीचे हे सीमोल्लंघन केवळ आदर्शच नव्हे तर आधुनिक भारतामधील नव्या पिढीपुढील स्फूर्तिदायक आणि प्रेरणादायी दीपस्तंभ ठरले आहे. 

एकिकडे अशी सकारात्मक,उत्साह देणारी गोष्ट असताना आपल्या देशात दुसर्‍या बाजूला अन्याय- अत्याचार,धार्मिक तेढ वाढत चालले आहेत, ही मोठी चिंतेची गोष्ट आहे. धार्मिक अस्मितेच्या भूमिकेतून एकमेकांचे गळे घोटण्याचे आणि अमानुष कृत्यांद्वारे हिंसाचार, रक्तपात आदी प्रकार पुनः पुन्हा घडू लागल्याचे पाहून गेल्या पाच हजार वर्षांपासून जगाच्या पाठीवर भक्कमपणे उभ्या असलेल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचा खरा आधार ‘सहिष्णुता’ अथवा सर्वधर्मसमभाव आणि आचार-विचार स्वतंत्र्य ही आपली मूल्ये आहेत, याचा विसर पडत चालला आहे की, अशी परिस्थिती आपल्याला दिसते आहे. भारतीय संस्कृतीची आदर्श मूल्ये अलीकडच्या काळात पायदळी तुडविली जात आहेत. कायद्याच्या राज्याची पर्वा न करता मस्तवालपणे आक्रमक झुंडशाहीच्या मार्गाने धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक सलोख्याच्या, सामंजस्याच्या सुसंस्कृत आणि सभ्य, प्रगल्भ वैचारिकतेवर हल्ले सुरू आहेत. प्रसंगी स्वतःच्या राजकीय उद्दिष्टांच्या आड येणार्‍या अडथळ्यांचा ‘कोणत्याही’ मार्गाने निः पात करण्याच्या आडदांड घोषणाही देशाच्या विविध भागातून एव्हाना बिनधास्तपणे केल्या जात आहेत. आणि तशी कृती प्रत्यक्षातही आणली जात आहे. विरोधात लिहिणार्‍या-बोलणार्‍या पत्रकारांना घरी पाठवले जात आहेत.वृत्तपत्रांवर यान त्या कारणाने बंधने आणली जात आहेत. त्यांच्या जाहीराती बंद केल्या जात आहेत.

 देशात वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आपले आयुष्य वेचलेल्या  नरेंद्र दाभोळकर, निर्भिड लेखक आणि ज्येष्ठ विचारवंत एम.एम. कलबुर्गी, पानसरे आणि परवाच कर्नाटकातल्या पत्रकार गौरी लंकेश यांच्यासारख्या बेधडक विचार मांडणार्‍यांच्या दिवसा-ढवळ्या हत्या केल्या जात आहेत. माणसे मारली जात असली तरी विचार मरत नाही. मात्र अशा प्रकारे माणसे संपवून दहशत निर्माण केली जात आहे. ही बाब मोठी चिंताजनक आहे. 

Rate Card

 आपल्या देशात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महिलांवरील वाढते अत्याचार तर फारच वाढले आहेत. त्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. अशा सर्व अभद्र वातावरणात संपूर्ण देशाची सुरक्षितता आणि सामान्य नागरिकांचे संरक्षण यासारखी मूलभूत जबाबदारी सांभाळणार्‍या राज्यकर्त्या पक्षांचे कर्तव्य मुख्यतः सेवाव्रती असण्याऐवजी सत्ताव्रती बनल्याचे अनुभवास यावे, हे भारतीय लोकशाहीचे खरोखर दुर्दैव आहे. 

एखादा उपद्रवी पक्ष केवळ राजकीय सत्तेसाठी आवश्यक ठरणारे बहुमत कायम टिकविण्यासाठी उपयोगी ठरू शकतो, या धोरणी भूमिकेतून त्या पक्षाकडून होणारी लोकशाही आणि कायद्याच्या राज्याची बेमुर्वतखोरपणे होणारी पायमल्ली दुर्लक्षित करण्याचे प्रकारही देशाच्या काही राज्यात उद्भवत आहेत; परंतु देशाची सार्वभौम व सर्वोच्च सत्ता ताब्यात असूनही केंद्र सरकारचे ज्येष्ठ जबाबदार नेतेच अशा वाढत्या झुंडसाहीची गांभीर्याने आणि कठोरपणे दखल न घेता ‘राजा हरिश्‍चंद्रा’प्रमाणे जबाबदारी ढकलण्याची भूमिका घेत आहेत. आता तर याच दूषित सार्वजनिक वातावरणात काही राज्यांमध्ये शालेय पाठ्यपुस्तकांमधील लोकशाहीला पूरक आणि उदारमतवादी विचाराशी निगडित थोर व्यक्तींचे धडे योजनाबद्धरीतीने वगळून टाकण्याचा प्रयत्न जो हाती घेण्यात आला आहे. तो तर वाढत्या ‘असहिष्णुते’च्या धोकादायक वर्तनाचा ढळढळीत पुरावा ठरला आहे. म्हणूनच दसर्‍याचा सण साजरा करताना ‘सहिष्णु’ वातावरण निर्माण करण्यासाठी देशाला वेढा घालू पाहत असलेल्या विषारी असलेल्या ‘असहिष्णु रावण वृत्ती’ची राखरांगोळी निर्माण करण्यासाठी आजच्या मुहूर्तावर सर्वांनीच मानसिक तयारी करणे अपेक्षित आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत

Image result for ravan

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.