सांगली ः दिल्ली येथे खासदार संजयकाका पाटील यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांची भेट घेवून सांगली जिल्ह्यात द्राक्ष संशोधन केंद्राची स्थापन करणेबाबत मागणी केली. या विषयाबद्दल मंत्रीमहोदयांनी सखोल चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली.
खासदार संजयकाका पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार, भारतात १४० हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्षाची लागवड केली जाते. त्यापासून एकूण उत्पादन ३१२५ हजार टन आणि निर्यात अंदाजे रु. २१७७ कोटी म्हणजेच देशातील एकूण निर्यातीपैकी जवळपास ८०% निर्यात महाराष्ट्रातून विशेषतः सांगली जिल्ह्यातून होते. सांगली, नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर आणि उस्मानाबाद येथे द्राक्षशेतीचे क्षेत्र वाढताना दिसत आहे. सांगली जिल्हा त्याच्या उत्कृष्ट गुणवत्तेमुळे बेदाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. देशातील एकूण बेदाणा उत्पादनात ९० टक्के वाटा हा सांगली जिल्ह्याचा आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव, मिरज, पलूस, कडेगाव, आटपाडी, कवठे – महांकाळ ही बेदाणा उत्पादक केंद्रे आहेत.
सांगलीत बेदाण्याचे अंदाजे वार्षिक उत्पादन १.२५ लाख टन असून त्यातील ३०-४० टक्के निर्यात होते. सुमारे १०० पेक्षा जास्त व्यापारी केंद्रे आणि ७० शीतगृहे असलेल्या तासगावमध्ये १९९४ मध्ये जिल्हा लिलाव बाजार सुरू झाला. बेदाणा उत्पादनासाठी थॉम्पसन सीडलेस, माणिकचमन, सोनाका आणि तास-ए-गणेश या बिया नसलेल्या द्राक्षांच्या जातींना प्राधान्य दिले जाते. अशाप्रकारे, नवीन क्षेत्रामध्ये द्राक्षांचा आर्क विस्तार आणि संवर्धनासाठी जिल्ह्याला वाव आहे. ज्याकरिता नियमित संशोधन आणि विकास समर्थन आवश्यक आहे. द्राक्ष हे उच्च मूल्याचे पीक आहे परंतु अलीकडे जास्त उत्पादनांची मागणी आहे.
त्यामुळे या भागातील द्राक्ष उद्योगाची गरज पूर्ण करण्यासाठी व या क्षेत्राचा सर्वांगीण विकास होणेसाठी सांगली जिल्ह्यात द्राक्ष संशोधन केंद्राची स्थापना करावी अशी खासदार संजयकाका पाटील यांनी मागणी केलेली आहे.