महाराष्ट्र दादांना कधीही विसरू शकणार नाही. एक स्वातंत्र्यसेनानी, देशासाठी पाठीवर गोळी झेललेला एक लढवय्या नेता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झटकन क्रांतिकारी विचारधारा बदलून विकासाचा, सहकाराचा विचार राबवून माळरानावर सहकार फुलवणारा महाराष्ट्राचा फार न शिकलेला शहाणा माणूस म्हणजे दादा.
लाखो सर्वसामान्यांच्या विश्वासाची शिदोरी दादांना लाभली होती. अनेकजण दादांकडे मदतीच्या अपेक्षेने येत असत व दादाही त्यांना सढळ हाताने मदत करीत असत. सांगलीत एक जख्ख म्हातारी कार्यकर्त्यांच्या दाटीतून वाट काढीत दादांच्या पुढे आली आणि म्हणाली, ‘दादा मला पैसे द्या म्हाताऱ्याच्या डोळ्याचे ऑपरेशन करायच आहे. त्यासाठी पैसे पाहिजेत’ दादांनी लगेच त्या म्हातारीच्या हातात चेक लिहून दिला. असे अनेक किस्से आहेत.
स्वतंत्र आंदोलन ऐन जोमात होते. वसंतदादांना पकडून देणाऱ्यास सरकारने बक्षीस जाहीर केलं होत. अशातच कॉलऱ्याची साथ सुरु होती. दादांनी सर्व सहकाऱ्यांना गुपचूप सांगलीच्या फौजदार गल्लीत बोलवून घेतले. पूर्वकल्पना न देता बोलावल्यामुळे ५०-६० सहकारी धावत पळत आले. दादांनी सर्वांना एकत्र करून डॉक्टरकरवी सर्वांना कॉलरा प्रतिबंधक लस टोचून मगच सोडून दिले.
दादा म्हणजे मोठा भाऊ असतो, आणि वडीलकीच्या नात्याने लहानाची काळजी घेण्याची जबाबदारी मोठ्या भावाची असते असे दादा मानीत. दादांजवळ येणारा, त्यांना एकदा भेटणारा तो कोणीही असो, तो दादांचाच होऊन जात असे. आणि त्याची दादांनी कधीही जबाबदारी टाळली नाही.