आजपासून जिल्ह्यात कोविड-19 निर्बंधामध्ये शिथिलता
सांगली : राज्य शासनाने राज्यातील ज्या जिल्ह्यामध्ये कोव्हीड-19 लसीचा पहिला डोस 90 टक्के व दुसरा डोस 70 टक्के पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, तसेच कोव्हीड-19 बाधितांचा दर हा 10 टक्के पेक्षा खाली आलेला आहे व 40 टक्के पेक्षा कमी ऑक्सिजन किंवा ICU बेड वर लोक आहेत, अशा जिल्ह्यांचा समावेश ‘अ’ श्रेणी मध्ये केला असून अशा जिल्ह्यांना अधिक शिथिलता दिली आहे. ‘अ’ श्रेणी मध्ये सांगली जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी शासन निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दि. 9 व 10 जानेवारी 2022 तसेच दि. 1 फेब्रुवारी 2022 रोजी पारित केलेल्या आदेशामध्ये दि. 4 मार्च 2022 रोजीचे 00.00 वाजल्यापासून खालील प्रमाणे शिथिलता दिली आहे.
- पूर्ण लसीकरणाची आवश्यकता
- सर्व आस्थापनांच्या सर्व कर्मचाऱ्यांचे, जे मोठया प्रमाणावर सार्वजनिक सेवा पुरवतात त्यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे.
ii.सर्व प्रकारच्या घरपोच सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे.
iii. कोणत्याही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या वापरकर्त्यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे.
- मॉल्स, थिएटर, नाट्यगृहे, पर्यटन स्थळे, रेस्टॉरंट्स, क्रीडा कार्यक्रम, धार्मिक स्थळे इत्यादींना भेट देणारे अभ्यागत यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे.
- सर्व सार्वजनिक सेवा जेथे मोठया प्रमाणावर नागरिक एकत्र येऊन कोविड-19 विषाणूचा प्रसार होऊ शकतो आणि जेथे कोविड योग्य वर्तन (CAB) प्रभावीपणे लागू होऊ शकत नाही, अशा ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे व त्या ठिकाणी भेट देणाऱ्या सर्व नागरिकांचे संपूर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे.
- सार्वजनिक किंवा खाजगी कार्यालयात किंवा आस्थापनेमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे ज्यांचा सामान्य लोकांशी संबंध आहे त्यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे.
vii. कोणत्याही औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे.
- सामाजिक/ क्रीडा / मनोरंजन / शैक्षणिक / सांस्कृतिक / धार्मिक / राजकीय / विवाह आणि अंत्यसंस्कार यांच्या समावेशासह, उत्सव सबंधित कार्यक्रम आणि इतर मेळावे आणि मंडळे यांना सदर ठिकाणच्या 50% क्षमतेच्या मर्यादेपर्यंत परवानगी असेल. परंतु जेव्हा कोणत्याही कार्यक्रमास 1000 पेक्षा जास्त नागरिकांचा समावेश अपेक्षित असेल तेव्हा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असेल व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्यावर आवश्यकतेनुसार वाजवी बंधने घालू शकेल.
- महाराष्ट्र शासनाच्या संबंधित प्रशासकीय विभागाच्या कोणत्याही आदेशाच्या अधीन राहून सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रत्यक्ष वर्ग पुन्हा सुरू होऊ शकतात. सर्व शैक्षणिक संस्थांच्या प्रशासनांना ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने शिक्षण देण्याच्या हायब्रीड मॉडेलचा फायदाघ्यावा. सर्व प्री-स्कूल तसेच अंगणवाड्या आता प्रत्यक्षरीत्याही सुरू करता येतील. या सर्व संस्था, आस्थापनांनी कोव्हीड योग्य वर्तनांचे (CAB) चे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल.
- सर्वघरपोच सेवांना परवानगी आहे.
- सर्व शॉपिंग कॉम्प्लेक्स,सिनेमा हॉल, रेस्टॉरंट्स आणि बार, क्रीडा संकुले, व्यायामशाळा, स्पा, जलतरण तलाव, धार्मिक स्थळे, नाट्यगृहे, पर्यटन स्थळे, मनोरंजन उद्याने इत्यादींमध्ये 100% क्षमतेने काम करण्याची परवानगी असेल.
- संपूर्णलसीकरण झालेल्या व्यक्तींच्या आंतरराज्य आणि राज्यांतर्गत हालचालींवर कोणतेही निर्बंध नसतील. तसेच पूर्णपणे लसीकरण न झालेल्या व्यक्तींसाठी, आंतर-राज्य हालचालीसाठी 72 तासांसाठी वैध RT-PCR चाचणी अहवाल असणे आवश्यक आहे. प्रवासासाठी कोणत्याही नाहरकत दाखल्याची आवश्यकता नाही.
- सरकारी आणि खाजगीसह सर्व कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु राहतील.
- सर्व औद्योगिक आणि वैज्ञानिक संस्था पूर्ण क्षमतेने सुरु राहतील.
- या आदेशामध्ये समाविष्ट नसलेल्या कोणत्याही क्रियाकलापांना,100% क्षमतेच्या मर्यादेपर्यंत परवानगी असेल.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दि. 9 जानेवारी 2022 रोजी पारित केलेल्या आदेशामधील परिशिष्ट क्र.2 मध्ये नमूद कोव्हीड- 19 योग्य वर्तनांच्या नियमांचे सर्व आस्थापनांनी पालन करणे बंधनकारक असेल. या आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, Incident Commander तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध गुन्हे दाखल करण्याकामी सांगली जिल्ह्यातील सबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी / कर्मचारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.