सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

0

 

– शिवरायांच्या ताब्यात सांगली जिल्ह्यातील किल्ले
– मिरजेवरही केली होती स्वारी
– शहाजीराजे, संभाजी महाराज, राजाराम महाराज, शाहू महाराजांचाही सांगली जिल्ह्याशी संबंध

 

 

छत्रपती शिवाजी महाराज यांचे सांगली जिल्ह्याशी घनिष्ठ संबंध होते. जिल्हयातील भुपाळगड, मच्छींद्रगड आणि प्रचितगड हे तीन किल्ले शिवरायांच्या ताब्यात होते. मिरजेच्या किल्ल्याला शिवरायांनी घातलेला वेढा हा इतिहासप्रसिध्द आहे. शहाजीराजांचाही सांगली जिल्ह्याशी संबंध होता. शहाजीराजांकडे शिराळा परगणा हा मोकासा होता. सांगली जिल्ह्यातील बहुतांशी भाग हा आदिलशहाकडे होता. तो ताब्यात घेण्यासाठी शिवरायांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी वारंवार प्रयत्न केल्याचे आढळून येते. छत्रपती शिवरायांची रत्नजडीत लेखणी मिरजेत जतन करून ठेवण्यात आली होती. शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे पुत्र शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज अशा चार पिढ्यांचे सांगली जिल्ह्याशी कोणत्या ना कोणत्या कारणांनी संबंध आले होते. या संबंधाबाबत मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर अभ्यास करीत असून, त्यावर एक छोटेखानी पुस्तिका लवकरच प्रसिध्द होत आहे.
शहाजीराजांकडे शिराळा परगणा
शहाजीराजे हे आदिलशहाकडे असताना त्यांना सांगली जिल्ह्यातील शिराळा परगणा हा मोकासा म्हणून मिळाला होता. त्याची अनेक कागदपत्रे उपलब्ध आहेत. त्यावरुन शहाजीराजांच्या ताब्यात सध्याच्या शिराळा तालुक्यातील अनेक गावे असल्याचे स्पष्ट होते. शहाजीराजांचा सांगली जिह्याशी असलेला हा संबंध छत्रपती शिवरायांनी वृध्दींगत केल्याचे दिसते.
शिवरायांच्या ताब्यात सांगलीतील किल्ले
छत्रपती शिवरायांनी सांगली जिह्यातील मच्छींद्रगड, प्रचितगड आणि भुपाळगड हे किल्ले जिंकून स्वराज्यात आणले. या किल्ल्यांवर झालेल्या तत्कालीन लढायांची वर्णने उपलब्ध आहेत. सांगली जिह्याच्या बहुतांशी भागावर आदिलशहाची सत्ता असली तरी या तीन किल्ल्यांच्या सहाय्याने या भागात आदिलशाही सत्तेशी टक्कर देणे शिवरायांना शक्य झाले.
शिवरायांची मिरज स्वारी
या तीन किल्ल्याबरोबरच मिरज येथील प्रसिध्द असा भुईकोट किल्ला जिंकण्यासाठी शिवरायांनी केलेली स्वारी ही इतिहास प्रसिध्द आहे. हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे इ.स. 1660 मध्ये मिरजेत आले होते. 1659 च्या नोव्हेंबर महिन्यात अफजखानाचा वध केल्यानंतर शिवाजी महाराज आणि नेताजी पालकरांच्या फौजा विजापूरची अदिलशाही पादाक्रांत करण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांनी वाईपासून दक्षिण महाराष्ट्रातील अनेक गावे जिंकून घेतली. शिवचरित्राचे अस्सल साधन मानले गेलेल्या ‘शिवभारता’ मध्ये या गावांची नावे दिली आहेत. यामध्ये सध्याच्या कराड, वाळवा, तासगांव आणि मिरज तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या फौजेने ही गावे अगदी सहज जिंकली. त्यानंतर कर्नाटक सीमेलगत असलेल्या मिरजेतील भुईकोट किल्ल्यावर शिवरायांच्या फौजेने धडक मारली. शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला. पण, तो ताब्यात येईना. शिवाजी महाराजांच्या या मिरज स्वारीचे वर्णन तत्कालीन डच अधिकाऱ्यांनी पाच मे 1660 रोजी वेंगुर्ल्याहून पाठविलेल्या एका डच भाषेतील पत्रात केले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचाही पदस्पर्श
सांगली जिल्ह्याशी शहाजी महाराजांपासून सुरू झालेला छत्रपती घराण्याचा संबंध उत्तरोत्तर दृढ होत गेला. शिवाजी महाराजांच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचेही सांगली जिह्याशी संबंध असल्याच्या नोंदी आहेत. औरंगजेबाने संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर त्यांना शिराळामार्गे नेण्यात आल्याचे सांगितले जाते. जिल्हय़ातील भुपाळगडच्या स्वारीतही छत्रपती संभाजी महाराज सहभागी होते. या काळात सांगली जिल्हय़ाचा बहुतांशी भाग हा मुघलांच्या ताब्यात होता. तो स्वराज्यात सामील करून घेण्यासाठी या काळात वारंवार लढाया झाल्याचे दिसते.
छत्रपती राजाराम महाराजांनी दिली इनामे
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महारांजाच्या काळात जिल्हय़ाचा काही भाग स्वराज्यात सामील झाला. त्यासाठी संताजी घोरपडे, धनाजी जाधव या सरदारांनी मोठे परिश्रम घेतले. संताजीच्या या कामगिरीबद्दल छापती राजाराम महाराजांनी त्यांना सन 1692 मध्ये मिरज मामल्यातील 22 कर्यातींचे देशमुखी वतन इनाम दिले. सन 1694 मध्ये राजाराम महाराजांनी सांगली जिल्हय़ातील ब्रम्हनाळ हे गाव आनंदमूर्तींना रघुनाथस्वामींच्या वृंदावनाच्या नैवैद्य नंदादीपाबद्दल इनाम दिले होते.
छत्रपती शाहूंनी जिल्हा स्वराज्यात आणला
छत्रपती राजाराम महाराज यांच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज (सातारा) यांनी तर संपूर्ण सांगली जिल्हा हा स्वराज्यात सामील करुन घेतला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सांगलीचा बहुतांशी भाग हा मुघलांच्या ताब्यात होता. मिरजेचा बलाढय़ भुईकोट किल्ल्यावर मुघल किल्लेदार दिलेलखान ठाण मांडून बसला होता. आसपासच्या प्रदेशही त्याच्याच ताब्यात होता. त्यामुळे सातारच्या शाहू महाराजांनी सन 1739 साली मिरजेवर स्वारी करून हा परिसर आणि संपूर्ण जिल्हा पहिल्यांदा स्वराज्यात आणला.
चार पिढय़ांचे जिल्ह्याशी संबंध
शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, त्याचे पुत्र शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज अशा चार पिढय़ांचे कोणत्या ना कोणत्या कारणांनी सांगली जिल्हय़ाशी संबंध आले आहेत. छत्रपती घराण्यातील या प्रसिध्द व्यक्तिच्या सांगली जिह्याशी असलेल्या या संबंधावर आधारीत साधार पुस्तिका मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर हे लवकरच प्रसिध्द करणार आहेत.

छत्रपती शिवरायांची रत्नजडीत लेखणी मिरजेत
छत्रपती शिवरायांची रत्नजडीत लेखणी आणि दौत मिरजेत होती. या लेखणीची 80 वर्षांपूर्वीची दोन अस्सल छायाचित्रे आणि त्यासंबंधी माहिती देणारी कागदपत्रे मिरज येथील इतिहास अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांच्याकडे आहेत. त्यापैकी एक छायाचित्र मिरजेतील छायाचित्रकार रणधीर मोरे यांचे आजोबा हरिभाऊ मोरे यांच्या संग्रहात आहे. यामध्ये एक रत्नजडीत दौत आणि लेखणी ठेवण्याचे कलमदान आहे.
तर, दुसरे छायाचित्र सन 1935 मध्ये तत्कालीन मिरज संस्थानचे अधिपती गंगाधरराव बाळासाहेब पटवर्धन यांच्या कन्या लक्ष्मीबाई मुजुमदार यांनी संकलीत केलेल्या ’मिरज अल्बम’ मध्ये आहे. यामध्ये या रत्नजडीत लेखणीची माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे ’ही लेखणी मिरज येथील वासुदेव नाईक नरगुंदे यांनी सातारा येथील लिलावात विकत घेतली. ती श्रीमंत गंगाधरराव पटवर्धन यांनी नरगुंदे यांच्याकडून विकत घेतली. ती स्वराज्यसंस्थापकांच्या स्मरणार्थ जतन करून ठेवण्यात आली आहे. शिवरायांच्या या लेखणीची माहिती देणाऱ्या सन 1948 मधील आणखी एक कागदात मिरज संस्थानातील मौल्यवान वस्तूंची यादी देताना ’सातारा राजघराण्यातून आणलेली दौत आणि लेखणी’ असा उल्लेख केला आहे.

Rate Card

 

इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर,
मिरज

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.