जतची ही खेळाडू करणार आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व
जत, संकेत टाइम्स : कर्नाटक राज्यांमधील मंड्या येथे नुकत्याच संपन्न झालेल्या बारा वर्षाखालील ३४ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत मुलीच्या गटात आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रेया गुरु हिप्परगी हिने द्वितीय क्रमांक पटकावून क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्र राज्याचे नाव उंचावले आहे. मुळची सिंदूर गावातील श्रेया ही जत तालुक्यातील संख गावात राहत असून ती संखच्या राजाराम बापू पाटील माध्यमिक प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मध्ये सहावीत शिकत आहे.
या स्पर्धेत यजमान कर्नाटकसह महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, ओडीसा, केरळ, गुजरात आदी राज्यातून एकूण १३४ स्पर्धकांनी भाग घेतला होता. अकरा फेऱ्यात झालेल्या या स्पर्धेत श्रेयाने चमकदार खेळ करत शेवटपर्यंत अपराजीत राहत सात सामने जिंकले व चार सामने बरोबरीत रोखत एकूण ९ गुण प्राप्त केले. श्रेयाने महाराष्ट्राची अनैषा नहार, तमिळनाडूची वैष्णवी एस के, उत्तराखंडची शेरलीन पटनायक, पश्चिम बंगालची सपर्या घोष यांच्याबरोबर सामना बरोबरीत राखला तर आंध्र प्रदेशची मानांकित सज्योत्स्ना कटारी, गुजरातची श्रेया शाह, दिल्लीची हिया गर्ग व आद्या जैन, तमिळनाडूची के. थीफीगा, कर्नाटकाची श्रीयाना एस मल्ल्या या आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूंना पराभूत केले. तसेच अग्रमानांकित स्पर्धेचे विजेतेपद पटकाविणाऱ्या उत्तर प्रदेशच्या शुभी गुप्ता हिला पराभवाचा धक्का दिला.

अंतिम फेरीअखेर शुभी व श्रेयाचे समान नऊ गुण झाल्यामुळे टायब्रेकमध्ये बोकोल्स गुण कमी असल्यामुळे श्रेयाने स्पर्धेचे उपविजेतेपद तसेच रोख रक्कम रु. ६०,००० व आकर्षक चषक पटकाविला. श्रेयाला आशियाई व जागतिक स्पर्धेत भारतीय संघाचे पुन्हा एकदा प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. यापूर्वीदेखील श्रेयाने आपल्या खेळाची चुणूक दाखवत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उलेखनीय यश प्राप्त करत संखचे नाव जागतिक पटलावर कोरले आहे. सध्या
श्रेया नागपूरचे इंटरनॅशनल मास्टर अनुप देशमुख व सोलापूरचे राष्ट्रीय प्रशिक्षक सुमुख गायकवाड यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. तर वडील गुरु हिप्परगी व आई आशाराणी हिप्परगी यांचे प्रोत्साहन लाभत आहे.संख सारख्या ग्रामीण भागात असून सुद्धा श्रेयाने केलेल्या आकर्षक कामगिरीमुळे सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांनीसुद्धा श्रेयाचे कौतुक व सत्कार करत व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सांगली जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष गिरीश चितळे, सचिव चंद्रकांत वळवडे, उपाध्यक्ष चिदंबर कोटीभास्कर, चिंतामणी लिमये, दिपक वायचळ आदींनी श्रेयाचे अभिनंदन केले.