डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेस मुदतवाढ

0
Rate Card
कोल्हापूर : अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांना घरगुती नवीन वीजजोडणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ सुरु करण्यात आली आहे. या योजनेतून अद्यापपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात २१८ तर सांगली जिल्ह्यात १०० वीजजोडण्या दिलेल्या आहेत. भविष्यातील वीज जोडणी मागणी लक्षात घेऊन या योजनेस ६ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तेंव्हा अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे महावितरणचे आवाहन आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून दि. १४ एप्रिल २०२१ पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे.  यापूर्वी या योजनेचा कालावधी १४ एप्रिल २०२१ ते ६ डिसेंबर २०२१ पर्यंत होता. आता त्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजने’मध्ये लाभार्थी अर्जदारांना घरगुती वीजजोडणीसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्याची सोय आहे. या वीजजोडणीसाठी महावितरणकडे केवळ ५०० रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम देखील पाच समान मासिक हप्त्यांमध्येच वीजबिलातून भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. वीजजोडणीचा अर्ज महावितरणकडून मंजूर झाल्यानंतर विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास पुढील १५ कार्यालयीन दिवसांमध्ये वीजजोडणी कार्यान्वित करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी वीजजोडणीसाठी विद्युत पायाभूत सुविधा तयार करावी लागणार आहे अशा ठिकाणी महावितरणकडून स्वनिधी किंवा जिल्हा नियोजन विकास समितीचा निधी (विशेष घटक योजना तथा आदिवासी उपाययोजना सहित) किंवा कृषी आकस्मिकता निधी तसेच इतर उपलब्ध होऊ शकणाऱ्या निधीमधून प्राधान्याने पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येईल व संबंधीत लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात येईल.

अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अर्जदारांनी नवीन घरगुती वीजजोडणीसाठी सक्षम प्राधिकाऱ्यांचे जातीचे प्रमाणपत्र, वीजजोडणीच्या विहित नमून्यातील अर्जासोबत आधार कार्ड, रहिवासी कार्ड जोडावे. अर्जदारांनी अर्ज केल्याच्या ठिकाणी वीजबिलाची पूर्वीची थकबाकी नसावी. तसेच शासनमान्य विद्युत कंत्राटदाराकडून वीजसंच मांडणीचा चाचणी अहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.