गुजरात टायटनचे ‘हार्दिक’ अभिनंदन!                     

0
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या पंधराव्या हंगामाची नुकतीच सांगता झाली. अहमदाबादच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी  स्टेडियमवर सव्वा लाख प्रेक्षकांच्या साथीने रंगलेल्या अंतिम सामन्यात रविवारी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटनने संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघाचा सात गडी राखून पराभव करीत आयपीएलच्या झळाळत्या चषकावर स्वतःचे नाव कोरले. विशेष म्हणजे गुजरात टायटन पहिल्यांदाच आयपीएल खेळत होती. आपल्या पहिल्याच आयपीएलमध्ये विजेतेपद पटकवण्याची अनोखी कामगिरी गुजरात टायटनने केली.
वास्तविक आयपीएल सुरू झाली तेंव्हा गुजरात टायटन विजेता होईल असे भाकीत कोणीही केले नव्हते. नेहमीप्रमाणेच मुंबई किंवा चेन्नई विजेतेपद मिळवतील असा जाणकारांचा होरा होता. काहींनी बंगळुरू तर काहींनी कोलकाता, पंजाब आणि दिल्लीला पसंती दिली होती. मात्र विजेता ठरला गुजरात. क्रिकेटचे हेच वैशिष्ट्य आहे. ज्या चेन्नई, मुंबईवर जाणकारांनी दाव लावला होता ते तळाशी राहिले आणि ज्याला कोणी खिजगणतीतही धरले नव्हते तो गुजरात टायटन विजेता ठरला. गुजरात टायटन पहिल्यांदाच आयपीएल खेळत असला तरी त्यातील खेळाडू मात्र नवखे नव्हते. या संघातील सर्व खेळाडू अनुभवी होते. गुजरात संघाचा कर्णधार अष्टपैलू हार्दिक पांड्या तर टी २० मधील स्पेशल खेळाडू आहे. मुंबई कडून खेळताना त्याने चार वेळा हा चषक उंचावला आहे. याशिवाय या संघातील अनेक खेळाडू अनुभवी आणि मॅच विनर आहेत. हार्दिक पांड्या, राहुल तेवटीया, डेव्हिड मिलर, राशीद खान, मोहम्मद शमी, वृद्धीमान साहा, शुभमन गिल हे सर्वच खेळाडू अनुभवी आणि मॅच विनर आहेत त्यामुळेच हा संघ संपूर्ण स्पर्धेत अव्वल राहीला आहे.
विशेष म्हणजे हा संघ कोणा एका खेळाडूवर अवलंबून नव्हता. प्रत्येक सामन्यात नवा खेळाडू संघासाठी धावून यायचा आणि सामना जिंकून द्यायचा. संपूर्ण स्पर्धेत हा संघ एकसंध दिसला.   प्रत्येक खेळाडूला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव होती. मैदानात उतरल्यावर या खेळाडूंच्या चेहऱ्यावर जबाबदारीची जाणीव दिसत होती. या संघातील सर्व खेळाडू संघातील इतर खेळाडूंचा खेळ एन्जॉय करताना दिसला. म्हणूनच फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडीवर हा संघ अव्वल ठरला. या संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या यानेही जबाबदारीने संघाचे नेतृत्व केले. पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करीत असूनही तो कोठेही दबावात दिसला नाही. अतिशय शांतचित्ताने त्याने संघाचे नेतृत्व केले. या स्पर्धेत एक वेगळाच हार्दिक पांड्या पाहायला मिळाला.

 

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.