भारतीय संस्कृतीचा देश विदेशात प्रचार करण्यासाठी संस्कृती शाळा मॉडेल ठरेल- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0

 

पुणे : भारतीय संस्कृतीचा देश विदेशात प्रचार करण्याच्याकामी संस्कृती शाळा मॉडेल ठरेल, तसेच या शाळेतून विविध क्षेत्रात कामगिरी करणारे उत्तम नागरिक निर्माण होतील, असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.

भुकुम येथील संस्कृती शाळेच्यावतीने देण्यात येणाऱ्या ‘संस्कृती पुरस्कार–२०२२’ वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्हाईस ॲडमिरल अजय कोच्चर, संस्थापिका देवयानी मुंगली, विश्वस्त कॅ. गिरीजाशंकर मुंगली, अनुज मुंगली व प्रणित मुंगली, भुकुम शाळेच्या प्राचार्या दामिनी जोशी आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, आपण आपल्या संस्कृतीचा आदर बाळगला पाहिजे. आई-वडील, शिक्षक आणि देशाची सेवा करावी आणि त्यांचा आदर ठेवावा. सांस्कृतिक मूल्य जोपासल्याने आपल्या क्षेत्रात प्रगती साध्य करता येईल. आपल्या क्षेत्रात चांगले विचार घेऊन मार्गक्रमण केल्यास यश निश्चित मिळेल. शैक्षणिक जीवनात महत्त्वकांक्षाबरोबरच एक ध्येय समोर ठेवून पुढील वाटचाल करत राहा.

माणसाच्या चांगल्या कृतीतूनच संस्कृतीची निर्मिती होत असते. देशाची सेवा नि:स्वार्थपणे केली पाहिजे. व्यक्तीव्यक्तींमध्ये कनिष्ठ-वरिष्ठ असा भेदभाव न करता त्यांच्या चांगल्या गुणांचा सन्मान करण्याची आपली परंपरा आहे. विविध क्षेत्रात मोठमोठ्या पदावर कार्यरत असणाऱ्यांनी भारतीय संस्कृतीचा प्रसार करायला हवा, आणि यशाच्या शिखरावर असतानाही आपल्या मातृभूमीला विसरता कामा नये. तसेच आपण आपल्या मातृभाषेतूनच बोलले पाहिजे, असेही श्री.कोश्यारी म्हणाले.

Rate Card

व्हाईस ॲडमिरल श्री. कोच्चर म्हणाले, शाळेत आल्यानंतर ४० वर्षापूर्वीच्या डेहराडून येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीमधील शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा मिळाला. प्रबोधनीमधील पायाभूत शिक्षणामुळे तसेच येथील शारीरिक, मानसिक, सामाजिक अशा सर्वांगीण विकासामुळे देशसेवा करण्याची संधी मिळाली. नवीन शैक्षणिक धोरणामुळे देशाचा विकासास हातभार लागणार आहे. संस्कृती शाळेमध्ये शिक्षण घेवून उत्तम नागरिक समाजात घडतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

उत्कृष्ट राष्ट्रीय सेवेबद्दल राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीचे कमांडंट व्हाईस ॲडमिरल अजय कोच्चर यांना सन्मानित करण्यात आले. जहांगीर रुग्णालयाचे अध्यक्ष एच. सी.जहांगीर (आरोग्य), लेखिका नमिता गोखले (साहित्य), आमदार सिद्धार्थ शिरोळे (प्रशासन), ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजित डिसले आणि शिक्षणतज्ज्ञ कमला इदगुंजी (शैक्षणिक) मिरर नाऊचे सहसंपादक मंदार फणसे आणि सकाळचे संपादक सम्राट फडणीस (पत्रकारिता), नेमबाज प्रियेशा देशमुख (क्रीडा) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

राज्यपाल महोदयांच्या हस्ते संस्कृती शाळेच्या प्रागंणात वृक्षारोपण करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.