महिला सशक्तीकरण: काल आणि आज

0
भारतीय संस्कृतीमध्ये नारीला सन्मानजनक वागणूक देण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. आपल्या वैदिक शास्त्रांत म्हटलं गेलं आहे,’यत्र नार्यस्तु पूजयंते, रमयंते तत्र देवता’.हिंदू सनातन धर्मात माता दुर्गेला जगाचे पालन करणारी ,त्यांचे कल्याण करणारी आणि दृष्टांचा संहार करणारी अधिष्ठात्री देवी मानली गेली आहे.गार्गी,सावित्री,सीता,कौशल्या आणि कुंतीसारख्या अनेक विदुषी नारींच्या व्यक्तिमत्त्व,त्याग आणि साहसाच्या गाथा आजदेखील आपल्या समाजात ऐकल्या,वाचल्या आणि पाहिल्या जातात. भारतीय समाजाच्या विविध कालखंडांवर नजर टाकल्यावर आपल्याला लक्षात येईल की, महिलांना वैदिक काळात कुंटुंबात,समाजात आदराचे स्थान होते.
तत्कालीन समाजात अशी धारणा होती की,नारीशिवाय पुरुषाला धर्म,कर्म, अर्थ,काम आणि मोक्षाची प्राप्ती होऊ शकत नाही. उत्तर वैदिक काळ येईपर्यंत महिलांच्या या उन्नत स्थितीमध्ये आंशिक घसरण येऊ लागली.सामाजिक स्तरावर त्यांच्यावर काही निर्बंध लादले जाऊ लागले. या दरम्यान बालविवाहाची प्रथाही सुरू झाली होती. अर्थात या काळात महिलांची परिस्थिती फार वाईट होती, असे नाही.  वैदिक युगानंतरच्या काळात अकराव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत महिलांची परिस्थिती हळूहळू कमकुवत होत चालली होती. मध्यकालीन युगात नारी दशा दयनीय अवस्थेत पोहचली होती. समाजात ‘पडदा’  प्रथा सुरू झालेली होती. घरात आणि घराबाहेर पदर डोक्यावरून डोळ्यांपर्यंत घेऊन वावरावं लागू लागलं. महिलांचे आर्थिक परावलंबित्व,कुलीन विवाह प्रथा आणि अशिक्षितपणा आदी कारणांमुळे त्यांची अवस्था फारच दयनीय स्तरावर पोहचली होती.

 

वर्तमानाचा विचार करताना महिलांच्या परिस्थितीचा स्वातंत्र्य पूर्व आणि स्वातंत्र्यानंतर अशा वेगवेगळ्या कालखंडाचा अभ्यास करायला हवा.स्वातंत्र्य पूर्व काळात महिला अनेक प्रकारे सामाजिक,आर्थिक आणि राजनैतिक रुढींमध्ये आपलं आयुष्य  जगत होत्या. या मागे अशिक्षित,आर्थिक परावलंबित्व, संयुक्त कुटुंब पद्धती, बहुपत्नी प्रथा आणि हुंडा प्रथा यासारख्या कुप्रथा जबाबदार राहिल्या.

 

Rate Card
सध्याच्या घडीला महिलांची परिस्थिती, विकास आणि त्यांच्या सशक्तीकरणाचा सवाल अत्यंत महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्याचे सातवे दशक गेल्यानंतर ज्या प्रकारे शिक्षण, आरोग्य, औद्योगिकीकरण, रोजगार, नागरिकीकरण अशा क्षेत्रात प्रगती होण्याबरोबरच समाजात सामाजिक आणि राजकीय जाणिवांमध्येदेखील विकास होऊ लागला. तरीही महिलांच्या परिस्थितीत फार समाधानकारक अशी प्रगती दिसली नाही.

 

अलीकडच्या काही दशकात मात्र आपल्या देशात महिल्यांच्या शैक्षणिक स्थितीत सुधारणा झाली आहे. पण तरीही साक्षरतेची टक्केवारी पुरुषांच्या तुलनेत कमीच आहे.2001 च्या जनगनेनुसार देशाची एकूण साक्षरता 64.4 होती. यात पुरुषांची साक्षरता 75.85 टक्के तर महिलांची साक्षरता 54.16 टक्के होती. या अगोदर 1991 मध्ये पुरुषांच्या साक्षरतेचा दर 54.16 टक्के होता आणि महिलांचा 39.29 टक्के. 2011 च्या जनगणनेनुसार देशातील साक्षरता 74 टक्के आहे. यात पुरुषांच्या साक्षरतेचा दर वाढून 82.1 टक्के आणि महिलांची साक्षरता 64.5 टक्के झाली आहे.

 

समाजात प्रत्येक पुरुष आणि महिलेला संविधानाने समान स्तरावर समस्त मूलभूत अधिकार दिले आहेत. पण तरीही कोणत्या ना कोणत्या रुपात सामाजिक रुढीवादी मान्यता आणि विषमतेमुळे महिलांना आपल्या अधिकारांपासून वंचित राहावे लागले आहे. अर्थात या महत्त्वपूर्ण मुद्द्यांच्या निराकरणाच्या दिशेने आपल्या देशातल्या काही गैरसरकारी संस्था, सामाजिक संस्था राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मदतीने महिलांचे प्रश्न दूर करण्याचा प्रयत्न करताना दिसतात.  प्रसार माध्यमे, मिडियादेखील महिला विकास आणि सशक्तीकरणबाबत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. महिला आणि बालविकास विभागदेखील महिलांच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील राहिला आहे. वर्तमानपत्र, टीव्ही आदींच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येणाऱ्या  बातम्या,  योजनांची माहिती  आणि जाहिराती यांचा व्यापक प्रमाणात प्रभाव महिलांवर पडत आहे. महिला सशक्तीकरण आणि विकास, बालिका शिक्षण,प्रौढ शिक्षण व महिलांच्या आरोग्या संबंधीच्या योजना आणि त्यासंबंधीत समस्यांबाबतचे कार्यक्रम दूरदर्शन, आकाशवाणीसह तमाम अन्य चॅनेल प्रसारित करून चांगला प्रयत्न करत आहेत. मात्र सिनेमा, मालिकांमधून महिलांचे चरित्र, व्यक्तिमत्त्व,आणि कौटुंबिक संबंध ज्या काल्पनिक आणि विकृत स्वरूपात दाखवले जात आहे. त्यामुळे समाजाला सकारात्मक विचार दिला जात नाहीए. महिलांचे सौंदर्य आणि शरीराचा उपयोग उपभोगाची वस्तू आहे,हेच सांगण्याचा प्रयत्न जाहिरातींमधून केला जात आहे. जाहिरात कंपन्यांचा उद्देश फक्त वस्तूंची विक्री व्हावी,हाच असतो. त्यामुळे असा सवाल उपस्थित होतो की, जाहिरात कंपन्या आपल्या बाजूने महिला सशक्तीकरण व विकासासाठी जाहिराती बनवू शकत नाहीत का? यशस्वी महिला उद्योजिकांच्या मुलाखती, त्यांच्या कार्यावर आधारित फिचर, आलेख तयार करून त्याद्वारा समाजात जनजागृती करण्याचं महत्त्वपूर्ण काम केले जाऊ शकते. याशिवाय सिनेमा, नाटक, कठपुतळी कार्यक्रम, पथनाट्ये यासारखी माध्यमे महिला सशक्तीकरण, विकासाचा प्रबळ आधार बनवली जाऊ शकतात. यासाठी कंपन्यांनी पुढे यायला हवे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.