वारीमध्ये पाणी, स्वच्छता आणि सुरक्षा यावर भर द्यावा ; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

0

 

सोलापूर : आषाढी वारीसाठी विविध जिल्ह्यातून तसेच इतर राज्यातूनही लाखो भाविक पंढरपुरात येतात. वारी कालावधीत येणाऱ्या भाविकांसाठी पाणी, स्वच्छता आणि सुरक्षा यावर भर देण्याच्या सूचना अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.

नियोजन भवन येथे आषाढी वारी नियोजनाबाबत संबंधित विभागाच्या आढावा बैठकीत श्री शंभरकर बोलत होते. बैठकीला अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, प्रांत अधिकारी गजानन गुरव, अप्पासाहेब तुपसमिंदर यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, आषाढी यात्रा कालावधीत यंदा मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता असल्याने नगरपालिका प्रशासनाने स्थानिक लोकसंख्या विचारात घेऊन स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा मुबलक प्रमाणात करावा. तसेच 65 एकर पत्राशेड, चंद्रभागा वाळवंट आदी ठिकाणी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होते. याठिकाणी मुबलक प्रमाणात शौचालयाची व्यवस्था करावी. याचबरोबर तात्पुरते शौचालय उभी करून त्याच्या वेळच्या वेळी स्वच्छतेसाठी यंत्रणा उभी करावी, वेळोवेळी पाहणी करावी. ज्या मठ प्रामुखाने तात्पुरत्या शौचालयाची मागणी केली असेल त्यांना उपलब्ध करून द्यावीत. वारी कालावधी वारकऱ्यांना गॅस वितरण व्यवस्था सुरळीत राहील, याची दक्षता गॅस वितरण कंपनीने घ्यावी.

यात्रा कालावधीत अन्नपदार्थामध्ये भेसळ होणार नाही याची अन्न व औषध प्रशासनाने दक्षता घ्यावी. 3 जुलैपासून शहरातील हॉटेल्स, प्रसाद दुकाने याची वेळोवेळी तपासणी करावी. दोषी आढळलेल्या व्यक्तीवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत. अन्नातून विषबाधा होणार नाही, शिळ्या अन्न वारकऱ्यांना देऊ नये, याबाबत मठ प्रमुखांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात. पंढरपूर शहर, पालखी मार्ग येथील औषध विक्री दुकाने दिवस-रात्र सुरू राहतील, याबाबत संबंधितांना आवश्यक सूचना द्याव्यात, अशाही सूचना श्री शंभरकर यांनी केल्या.

महावितरण कंपनीने पालखी मुक्कामाच्या ठिकाणी, शहरात अखंडित व सुरक्षित वीज पुरवठा राहील, याची दक्षता घ्यावी. जलसंपदा विभागाने यात्रा कालावधीत भीमा नदी पात्रात पाणी सोडण्याबाबत नियोजन करावे. जेणेकरून वारकऱ्यांना चंद्रभागा स्नानासाठी कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच नदीपात्रातील वाहतूक करणाऱ्या होड्या यांना आवश्यक सुरक्षितेच्या सूचना द्याव्यात.

Rate Card

आवश्यक त्या ठिकाणी अग्निशमन व्यवस्था करावी. याठिकाणी तज्ञ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. नवीन बसस्थानकावर पायाभूत सुविधा पूर्ण झालेल्या आहेत, पाण्याच्या सुविधेसाठी एसटीचे टँकर घ्यावेत, अशा सूचनाही श्री शंभरकर यांनी दिल्या.

अपर जिल्हाधिकारी श्री जाधव यांनी सांगितले कि, वारी कालावधीत सर्व मोबाईल जॅम होतात. संपर्कासाठी फोनची सुविधा खंडित होऊ नये.यासाठी बीएसएनएलने टॉवरची क्षमता वाढवून 21ठिकाणी हॉटलाइन सुविधा द्यावी.

हिंमत जाधव म्हणाले, गॅस वितरण आणि डिलेव्हरीच्या ठिकाणी रेस्क्यू टीम ठेवावी. मोबाईल सेवेसाठी विविध कंपनीचे मोबाईल व्हॅन टॉवर राहणार आहेत.

जिल्हाधिकारी श्री शंभरकर यांनी सर्व विभागांनी पूर्ण तयारी करण्याच्या सूचना केल्या. प्रत्येक विभागाने केलेली तयारी सादरीकरणातून मांडली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.