चिखलगी भुयार मठ येथे जमला वैष्णवांचा मेळावा ★ चिखलगी भुयार येथे पालखीचे स्वागत
जत, संकेत टाइम्स : श्री संत बागडेबाबा यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या चिखलगी भुयार मठ येथे आषाढी एकादशीनिमित्य विठ्ठल भक्तांनी मोठी गर्दी केली होती. चिखलगी भुयार मठ येथे वैष्णवांचा मेळावा जमला. विठ्ठल भक्तांनी विठ्ठलाचा जप करत पाऊस पडू दे, कोरोना दूर जावू दे असे साकडे विठूरायाला घातले.
मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे चिखलगी भुयार मठ येथे आषाढी वारी भरली नव्हती. पंढरपूरहुन विठुरायाचे दर्शन घेवून परतणारे भाविक तसेच दरवर्षी आषाढी वारीला चिखलगी भुयार मठाला येणाऱ्या भाविकांनी दोन वर्षांनी मंदिर परिसर भाविकांनी फुलला होता.
निंबोणी येथून दरवर्षी चिखलगी भुयार मठात पालखी येते. श्री संत बागडेबाबांच्या भक्तांची पालखी अशी ओळख आहे. मठाजवळ पालखी येताच चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी पालखीचे स्वागत केले. पालखीच्या स्वागतानंतर विठुरायाच्या घोषात, टाळ, मृदंगाच्या गजरात मंदिराला प्रदक्षिणा मारण्यात आली. यावेळी महिला व पुरुषांनी रिंगण करत फुगडी खेळली. भक्तीपूर्ण वातावरणात मठात आषाढी वारी पार पडली.
■ बळीराजा सुखी होवू दे- तुकाराम बाबा
मागील दोन वर्षात कोरोनाने शेतकऱ्यांचे, बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. कोरोना कायमचा हद्दपार होवू दे, यंदा दमदार पाऊस येऊ दे, बळीराजा सुखी होवू असे साकडे यावेळी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी विठुरायाला घातले.