सांगली ; अपहरण झालेल्या बांधकाम व्यावसायिक आणि शासकीय कंत्राटदाराचा वारणेच्या नदीपात्रात आज मृतदेह सापडला. मिरज तालुक्यातल्या कवठेपिराण या गावाच्या हद्दीत नदीमध्ये तरंगताना एक मृतदेह गावक-यांना दिसला. हा मृतदेह माणिकराव विठ्ठल पाटील यांचा असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. हा घातपात असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सध्या मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. प्लॉट दाखविण्याचे आमिष दाखवून माणिकराव पाटील यांचे मिरज तालुक्यातील तुंग येथे १३ ऑगस्टला रात्रीच्या सुमारास अपहरण झालं हाेतं. याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात पाटील यांच्या कुटुंबियांनी तक्रार नाेंदविण्यात आली हाेती. माणिकराव हे सांगली येथील रहिवासी आहेत. त्यांचा जमीन खरेदी करून त्यावर बांधकाम करण्याचा व्यवसाय आहे.
१० ऑगस्टपासून त्यांच्या मोबाईलवर एक व्यक्ती फोन करीत होता. संबंधित व्यक्ती तुंग परिसरात प्लॉट पाहण्यास येण्यासाठी आग्रह करीत होता. पाटील यांना वेळ नव्हता. त्यामुळे ते लगेच गेले नाहीत. परंतु संबंधित व्यक्ती सातत्याने फोन करू लागल्याने पाटील यांनी १३ ऑगस्ट रोजी येतो, असे सांगितलं. पाटील यांना दिवसभर वेळ मिळाला नाही. त्यामुळे त्या व्यक्तीने त्यादिवशी सायंकाळी पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधला त्यामुळे पाटील यांनी रात्री येतो असे सांगितले.
त्यानुसार ते कारने तुंगला गेले. त्यानंतर त्यांचा कुटुंबियांशी रात्री उशिरापर्यंत संपर्क झाला नाही. त्यामुळं त्यांच्या मुलाने पाटील यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. पण मोबाईल बंद लागत होता, दुसर्यादिवशी सकाळीही ते आले नाहीत. घरच्यांनी १४ आणि १५ ऑगस्टपर्यंत पाटील यांची प्रतीक्षा केली. मात्र ते आलेच नाही. त्यामुळे विक्रमसिंह ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी मंगळवारी तुंगमध्ये जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. परिसरातील सीसी टिव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपासणी केली. यामध्ये पाटील हे मिणचे मळ्याजवळ कार लाऊन उभे होते. तसेच काही लाेक त्यांच्याजवळ आले. थोडा वेळ त्यांच्याशी बोलून ते कारमध्ये बसून पाटील यांना घेऊन गेल्याचे स्पष्टपणे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. त्यामुळे पाटील यांचे अपहरण झाल्याची शंका व्यक्त केली गेली.

दरम्यान आज अपहरण माणिकराव पाटील यांचा मृतदेह मिरज तालुक्यातल्या कवठेपिराण या गावाच्या हद्दीत नदीमध्ये तरंगताना गावकऱ्यांना आढळला. या प्रकरणाचा तपास लावला जाईल असे पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी नमूद केले.