सततच्या पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास मिळणार भरपाई

0
2

              मुंबई : सततच्या पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार असून, नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणारी मदतीची रक्कम बाधितांना देण्यासाठी होणारा विलंब कमी टाळण्यासाठी यापुढे पंचनाम्यासाठी मोबाईल अॅपचा वापर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  विधानसभेत सांगितले.

सन २०२२ च्या माहे जुलै व ऑगस्ट महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टीबाबत विधानसभेत नियम २९३ अन्वये  झालेल्या चर्चेत सर्वश्री विरोधी पक्ष नेते अजित पवार, अशोक चव्हाण, समीर कुणावार, संजय गायकवाड, भास्करराव जाधव, छगन भुजबळ, नाना पटोले, बच्चू कडू, राजेश पवार, चंद्रकांत नवघरे, सुरेश वरपूडकर, कैलास पाटील, धर्मरावबाबा आत्राम, प्राजक्त तनपुरे, ॲड. आशिष जयस्वाल, नरेंद्र भोंडे, राजेश टोपे, किशोर जोरगेवार, हिरामण खोसकर, हरीश पिंपळे, अनिल पाटील यासह मान्यवर सदस्यांनी आपली मत मांडून विविध मागण्या मांडल्या होत्या.

 

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, अतिवृष्टीमुळे (६५ मिमि पेक्षा जास्त) नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देण्यात येते. मात्र, आजपर्यंत मागणी लक्षात घेता, सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल.

पंचनाम्यासाठी मोबाईल अॅपचा वापर

            नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणारी मदतीची रक्कम बाधितांना देण्यासाठी होणारा विलंब कमी करण्यासाठी यापुढे पंचनाम्यासाठी मोबाईल अॅपचा वापर करण्यात येईल. लवकरच मोबाईल अॅप्लीकेशनद्वारे ई-पंचनामा करणे, त्यासाठी आवश्यक निधीची मागणी करणे व संबंधितांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट पैसे जमा करणे अशा प्रकारची प्रणाली नव्याने विकसित करण्यात येत आहे. यामध्ये रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा (सॅटेलाइट इमेज) वापर करण्यात येणार आहे. तसेच ड्रोन तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येणार असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले. 

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here